Operation Midnight Hammer : इराणच्या न्यूक्लियर प्लांटवरील हल्ला फसला, अमेरिकेच्याच इंटेलिजन्स रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
Operation Midnight Hammer : अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर काही हजार किलोचे बॉम्ब टाकले. या हल्ल्याचा किती परिणाम झाला? त्या संदर्भात अमेरिकेचा इंटेलिजन्स रिपोर्ट समोर आलाय. त्यांनी प्रारंभिक विश्लेषण केलय. हा रिपोर्ट धक्कादायक आहे. जगातला हा सर्वात एका महागडा हल्ला होता. एका बॉम्बची किंमत 4 कोटी 91 लाख रुपये होती.

मागच्या 12 दिवसांपासून इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेला लष्करी संघर्ष आता थांबला आहे. दोन्ही देशांमध्ये अमेरिकेने युद्धविराम घडवून आणला. पण हे युद्ध सुरु असताना शनिवार-रविवारच्या मध्यरात्री अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला केला. अमेरिकेने इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर 30,000 पाऊंड म्हणजे 13,607 किलो वजनाचे बॉम्ब टाकले. त्याची किंमत 4,20000 पाऊंड म्हणजे 4 कोटी 91 लाख रुपये आहे. जगातील हा सर्वात महागडा हल्ला होता. कारण इराणचे अणवस्त्र प्रकल्प मूळापासून संपवण हा त्यामागे उद्देश होता. आता अमेरिकेच्या सिक्रेट रिपोर्टमधून या हल्ल्यातून इराणच किती नुकसान झालं? त्याचं विश्लेषण करण्यात आलं आहे. हा रिपोर्ट धक्कादायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर हे यशस्वी ऑपरेशन असल्याचा दावा केला होता. इराणची अणवस्त्र विकसित करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली असं त्यांनी म्हटलं होतं. पण अमेरिकेचा गोपनीय रिपोर्ट या उलट आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी जे प्रारंभिक विश्लेषण केलय त्यानुसार अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची अणवस्त्र विकसित करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. फक्त त्यांचा अणवस्त्र कार्यक्रम काही महिने मागे गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला की, इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर 30 हजार पाऊंडचा बॉम्ब टाकून त्यांचा अणूकार्यक्रम ऑब्लिट्रेटेड (डिरेल) केलाय. रिपोर्टनुसार इराणचा हा अणूप्रकल्प जमिनीखाली होता. बॉम्ब पडल्यामुळे त्यांचं जास्त नुकसान झालेलं नाही. केवळ प्रवेशद्वार बंद झालय. पण प्लान्टची संरचना सुरक्षित आहे.
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेने काय मान्य केलं?
अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही काही सेंट्रीफ्यूज काम करण्याच्या स्थितीमध्ये आहेत. इराणच यूरेनियम भंडार संपलेलं नाही, ते सुरक्षित आहे. व्हाइट हाऊसने हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेने हे मान्य केलय की, “हल्ल्यामध्ये इराणचा अणवस्त्र कार्यक्रम फक्त कमकुवत झालाय. पूर्णपणे नष्ट झालेला नाही”
याआधी व्हाइट हाऊसमध्ये असा मित्र नव्हता
“इराण विरुद्ध इस्रायलने ऐतिहासिक विजय मिळवलाय. इराणच अणवस्त्र बनवण्याच स्वप्न धुळीस मिळवलं” असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करुन म्हटलय. व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासारखा मित्र याआधी मिळाला नाही, अशा शब्दात नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलं.
