भारतीय ट्रॅव्हल एजन्सींवर डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कारवाई; थेट व्हिसावर निर्बंध, लावला हा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतातील काही ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर, सीईओंवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. त्यांच्यावर अमेरिकेनं व्हिसा बंदीची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून बेकायदेशीर स्थलांतराबद्दल सतत कठोर आणि मोठे निर्णय घेत आहेत. सोमवारी अमेरिकेनं भारतातील काही ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर, सीईओंवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदीची घोषणा केली. या एजन्सींवर अमेरिकेत जाणूनबुजून बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं, ‘मिशन इंडियाचे कॉन्सुलर अफेअर्स अँड डिप्लोमॅटिक सिक्युरिटी आमच्या दूतावास आणि कॉन्सुलेटमध्ये दररोज बेकायदेशीर स्थलांतर आणि मानवी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करत आहे.’
बेकायदेशीर इमिग्रेशन नेटवर्क तोडण्यासाठी भारतात कार्यरत असलेल्या ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर परराष्ट्र मंत्रालयाकडून व्हिसा निर्बंध लादण्यात येत असल्याचंही निवेदनात पुढे म्हटलंय. अशा एजन्सींविरोधात अमेरिका कारवाई करत राहील, असंही मंत्रालयाने स्पष्ट केलंय. “आमच्या इमिग्रेशन धोरणाचा उद्देश केवळ परदेशी नागरिकांना बेकायदेशीर इमिग्रेशनच्या धोक्यांबद्दल जागरूक करणं नाही तर आमच्या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांना जबाबदार धरणंदेखील आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिकेचं हे व्हिसा निर्बंध धोरण जागतिक स्तरावर लागू असून व्हिसा वेव्हर प्रोग्रामसाठी पात्र असलेल्यांनाही लागू असल्याचं निवेदनात स्पष्ट केलंय. दरम्यान नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील एका अधिकाऱ्याला याविषयी विचारलं असता त्यांनी सविस्तर माहिती देता येणार नसल्याचं म्हटलंय. व्हिसा रेकॉर्डच्या गोपनीयतेमुळे आम्ही अशा व्यक्ती किंवा ट्रॅव्हल एजन्सींची यादी देऊ शकत नाही, ज्यांच्यावर अमेरिका व्हिसा निर्बंध लादण्यासाठी कारवाई करत आहे, असं ते पुढे म्हणाले.
प्यू रिसर्च सेंटरच्या मते, 2024 पर्यंत अमेरिकेत अंदाजे 7,25,000 भारतीय स्थलांतरित होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, जानेवारी 2025 पासून 682 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे. त्यापैकी बहुतेकजण बेकायदेशीरपणे तिथं प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कठोर इमिग्रेशन धोरणं लागू केली आहेत.
