Donald Trump : सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, बोलत होते ते अखेर केलच
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची कमान संभाळल्यापासून जगात धाकधूक, टेन्शन वाढलं आहे. कारण ट्रम्प यांचे अनेक निर्णय जगावर दूरगामी परिणाम करणारे असतील, त्याची सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून एक शक्यता व्यक्त केली जात होती, ती खरी ठरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प असा निर्णय घेणार याची चर्चा होती. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार सभांमधूनच तसे संकेत दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे युक्रेनासाठी मोठा झटका आहे. कारण याआधी बायडेन प्रशासनाने रशिया विरोधी युद्धात युक्रेनला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य दिलं. यात अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र आहेत. इतकच नाही, अमेरिकेकडून अन्य देशांना जी मदत दिली जाते, ती सुद्धा थांबवण्याचा ट्रम्प यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयातून इस्रायल आणि इजिप्त या दोन देशांना वगळलं आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ नितीला अनुकूल आहे. अमेरिकेकडून अन्य देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशामुळे विकासापासून ते लष्करी मदतीपर्यंत सर्व काही प्रभावित होण्याची शक्यता आहे. बायडेन यांच्या कार्यकाळात रशियाशी दोन हात करण्यासाठी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र मिळाली. अमेरिकेच्या मदतीमुळेच युक्रेन या युद्धात टिकून राहिला. अमेरिकेने 2023 साली युक्रेनला 64 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मदत केली होती. मागच्यावर्षी किती मदत केली? त्याची माहिती रिपोर्टमध्ये नाहीय.
निर्णयांनी जग हैराण
“अमेरिकेकडून अन्य देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीची 85 दिवसांच्या आत अंतर्गत समीक्षा करण्यास सांगण्यात आलं आहे” असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची कमान संभाळल्यापासून जगात धाकधूक वाढली आहे. ट्रम्प यांनी सत्ता संभाळताच एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडका लावला आहे. त्याचा सगळ्या जगावर परिणाम होत आहे. त्यांच्या या निर्णयांनी जग हैराण आहे.
पुतिन यांना सुद्धा अल्टीमेटम
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अल्टीमेटम दिलं होतं. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पाऊल उचला अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल असा ट्रम्प यांनी इशारा दिला होता. ट्रम्प यांनी सांगितल्यानंतरही पुतिन यांनी युद्ध संपवण्यास नकार दिला, तर रशिया विरोधात आणखी कठोर प्रतिबंध लावले जाऊ शकतात. युक्रेनसोबत युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांना भेटण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की सुद्धा युद्ध संपवण्यासाठी तयार आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
