Donald Trump Tariff War : भारतावर दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना अखेर या देशासमोर झुकावं लागलं, एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी
Donald Trump Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. निश्चितच त्याचा जगाला फायदा आहे. भारतावर दादागिरी करणारे ट्रम्प एका देशासमोर झुकले आहेत. त्यांनी एका एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे येणाऱ्या दिवसात टॅरिफ वॉरची धार थोडी कमी होईल.

टॅरिफ वॉर सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफच्या मुद्यावरुन भारताला अडचणीत आणत आहे. भारताला त्रास देण्याची, नडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सामनावर त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावला आहे. 28 ऑगस्टपासून हा टॅरिफ दुप्पट होऊन 50 टक्के होणार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळे त्यांना युक्रेन विरोधात युद्ध सुरु ठेवण्यासाठी आर्थिक ताकद मिळते, असा ट्रम्प यांचा अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्यामागचा तर्क आहे. मात्र, त्याचवेळी या डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या एका मोठ्या देशासमोर शरणागती पत्करल्याच चित्र आहे. डोनाल्ड ट्रम्प चीनसमोर झुकले आहेत. त्यांच्या एका आदेशावरुन ही बाब स्पष्ट झालीय.
अमेरिकेने चीनवरील टॅरिफ सस्पेंशनची मुदत आणखी वाढवली आहे. म्हणजे अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ स्थगितीचा निर्णय आणखी 90 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव निवळला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल पोस्टवर एक एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर चीनने सुद्धा टॅरिफ सस्पेंशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरची धार थोडी कमी होईल अशी चर्चा सुरु झालीय.
कुठल्या ऑर्डरवर स्वाक्षरी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी एका ऑर्डरवर स्वाक्षरी करुन चीनवरील टॅरिफ सस्पेंशन आणखी 90 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, “मी एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी केलीय. चीनवरील टॅरिफ सस्पेंशनचा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकललाय. बाकी कराराचे बिंदू तेच राहतील”
ट्रम्प यांनी आज आदेश काढला नसता, तर काय झालं असतं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच अनेक देशांवर टॅरिफ लावण्यास सुरुवात केली. अमेरिका आणि चीनने परस्परांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला होता. ट्रिपल-डिजिट लेवलपर्यंत हा टॅरिफ पोहोचला होता. त्यामुळे दोन्ही देशांना परस्परासोबत व्यापार करताना बऱ्याच अडचणी आल्या. मे 2025 मध्ये दोन्ही देशांनी अस्थायी काळासाठी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. मागची डेडलाइन 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12:01 मिनिटांनी संपणार होती. असं झालं असतं तर अमेरिकेत चिनी सामानाच्या आयातीवर आधीपासूनच असलेला 30 टक्के टॅरिफ वाढला असता. प्रत्युत्तरात चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या सामनावर टॅरिफ वाढवला असता.
कुठे बैठक झाली?
टॅरिफ सस्पेंशन पुढे ढकलण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर चीनी स्टेट मीडिया शिन्हुआ न्यूज एजेंसीने सांगितलं की, स्टॉकहोम येथे अमेरिका-चीनच्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी करार पुढे वाढवत असल्याचं जॉइंट स्टेटमेंट जारी केलं. चीनने सुद्धा टॅरिफ हाइकला 90 दिवसांसाठी सस्पेंड केलं आहे. 10 टक्के ड्युटी कायम ठेवली आहे.
