Donald Trump : ट्रम्प यांची आणखी एक कुरापत, भारत पुन्हा हिटलिस्टवर, पाकिस्तानलाही…
टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध आधीच ताणलेले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला असून भारताने मात्र न झुकण्याची भूमिका घेतली आहे.या वादाच्या दरम्यानच आता ट्रम्प प्रशासनाने एक यादी जाहीर केली आहे.

टॅरिफच्या मुद्यावर भारत-अमेरिकेतील तणाव थोडासा निवळला असला तरी धुसफूस अद्याप कायम आहेच. मात्र असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक कुरापत काढली आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रपती निर्धार कायद्याअंतर्गत काँग्रेसला एक यादी सादर केली आहे, ज्यामध्ये अमेरिकेला अंमली पदार्थ आणि त्यांच्या रासायनिक संयुगे तयार करण्यात आणि पुरवण्यात गुंतलेल्या 23 देशांची नावे समाविष्ट आहेत. “प्रेसिडेंशियल डिटरमिनेशन ” असे काँग्रेसला सादर केलेल्या या अहवालाचे शीर्षक आहे. बेकायदेशीर औषधांचे उत्पादन आणि तस्करी युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा धोका निर्माण करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं. या यादीद्वारे ट्रम्पनी पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणते देश हिटलिस्टवर ?
या लिस्टमध्ये भारत, अफगाणिस्तान, बहामास, बेलीज, बोलिव्हिया, म्यानमार, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वेडोर, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, जमैका, लाओस, मेक्सिको, निकाराग्वा, पाकिस्तान, पनामा, पेरू आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
5 देशांवर लावले गंभीर आरोप
त्यात अमेरिकेने अशा पाच देशांची नावे देखील दिली आहेत ज्यांच्यावर अमली पदार्थविरोधी कर्तव्यांचे योग्यरित्या पालन करण्यात अपयश आल्याचा आरोप आहे. अफगाणिस्तान, बोलिव्हिया, म्यानमार, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे ते देश आहेत. अमेरिकेने या देशांना अंमली पदार्थविरोधी प्रयत्नांना बळकटी देण्याचे आवाहन केले आहे.
चीनवर थेट हल्ला
ड्रग्सवरून अमेरिकेने चीनवर जोरदार टीका केली आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा पूर्वसूचक रसायनांचा पुरवठादार आहे, जो फेंटानिल आणि इतर रासायनिक अंमली पदार्थांच्या उत्पादनाला चालना देतो. ही रसायने जगभरात नवीन व्यसनांना चालना देत आहेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी चीन सरकारला कठोर कारवाई करण्याचे, रासायनिक तस्करी थांबवण्याचे आणि दोषींवर खटला चालवण्याचे आवाहनही केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या देशाचा यादीत समावेश होणे म्हणजे तो देश सहकार्य करत नाही असे नाही. कधीकधी, भौगोलिक परिस्थिती, व्यापार मार्ग आणि आर्थिक परिस्थितीमुळे सरकारांना अंमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे थांबवणे अशक्य होते.
भारताचे यश
हा अहवाल समोर आलेला असतानाच भारतानेही कडक कारवाई केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अलीकडेच एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे.ही टोळी डिजिटल प्लॅटफॉर्म, ड्रॉप शिपिंग आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये ड्रग्जची तस्करी करत होती.
दिल्लीतील बंगाली मार्केटजवळ नियमित वाहन तपासणी सुरू असतानाच संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले. स्थानिक तपासात एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.भारताच्या या कारवाईचे अमेरिकेनेही कौतुक केले.
