प्रसिद्ध युट्यूबरला पाहण्यासाठी आलेला जमाव अनियंत्रित, केली दगडफेक आणि गाड्यांचीही तोडफोड, अनेक जखमी; कुठे घडला हा प्रकार ?
फेमस युट्यूबरला पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून गिफ्ट घेण्यासाठी तरूणांची मोठी गर्दी रस्त्यावर जमली होती. आनंदाचा माहौल होता, मात्र त्याला गालबोट लागले.

न्यूयॉर्क| 5 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध युट्यूबरची एक झलक मिळवण्यासाठी रस्त्यावर तरूणांची मोठी गर्दी जमली होती. मात्र अचानक दंगल (Viloence) उसळली. हजारो तरूणांचा जमाव अनियंत्रित झाल्याने त्यांनी जोरदार जाळपोळ व गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे समजते. यूएस मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध सेलिब्रिटी यूट्यूबर काय सेनाटची (Kai Cenat) एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून गिफ्ट मिळवण्यासाठी सुमारे दोन हजार तरूणांचा जमाव मॅनहॅटनमधील यूनिअन स्क्वेअर येथे जमला होता.
मात्र बघता-बघता तरूणांचा जमाव अनियंत्रित झाला आणि भांडण, दगडफेक सुरू झाली. त्यामध्ये अनेक निष्पाप नागरीक गंभीररित्या जखमी झाले. संतप्त झालेल्या जमावाने गाड्यांची तोडफोड करण्यासही सुरूवात केली. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सरच्या अवघ्या एका मेसेजमुळे ही घटना घडल्याचे समजते.
नक्की काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध युट्यूबर काय सेनाट हा इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. मॅनहॅटन येथे चाहत्यांना आपण भेटणार असून त्यांना गिफ्टही देणार असल्याचे त्याने या लाईव्ह व्हिडीओ दरम्यान जाहीर केले होते. गिफ्ट म्हणून प्ले स्टेशन 5 देणार असल्याचेही त्याने नमूद केले. काय सेनाटचा हा व्हिडीओ पोस्ट झाल्यावर बघता बघता तूफान व्हायरल झाला. काय सेनाट याचे सोशल मीडियावर लाखो सबस्क्रायबर्स आहेत.
काय सेनाटच्या व्हिडीओनंतर त्याचे हजारो चाहते, मॅनहॅटन येथे सांगितलेल्या जागी एकत्र जमले होते. सुमारे दोन हजार तरूणांचा जमाव कायची एक झलक पाहण्यासाठी व त्याच्याकडून गिफ्ट घेण्यासाठी मॅनहॅटनच्या यूनिअन स्क्वेअर येथे जमला होता.मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी काही तरूणांनी जमलेल्या गर्दीवर आणि पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तणावाची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला.
अनेक जण अटकेत
न्यूयॉर्क सिटी पोलिस प्रमुख जेफ्री माडेरे यांच्या सांगण्यानुसार, तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर पोहोचली होती. मोठ्या प्रमाणात लोकं जखमी झाले. पोलिसांनी जमावाला कसेबसे पांगवले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी काही तरूणांना दंगलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच युट्यूबर काय सेनाट यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
