गर्भाशय काढून टाकण्याची सर्जरी पण डॉक्टरांनी ऑपरेशन थेटरमध्ये…; 45 वर्षीय महिलेला भोगावे लागणार परिणाम
हाँगकाँगमध्ये एका वरिष्ठ सर्जनकडून सर्जरीदरम्यान मोठी चूक केली. या सर्जरीतील चुकीमुळे आता त्या 45 वर्षीय महिलेला मोठा परिणाम भोगावा लागणार आहे.

हाँगकाँगमध्ये एक वैद्यकीय निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही चूक एका वरिष्ठ सर्जनकडून झाली आहे. या सर्जनकडून अशी चूक झाली की त्याचा त्या रुग्णावर आयुष्यभर परिणाम झाला. डॉक्टरांना केवळ त्या महिलेचे गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स काढायच्या होत्या, परंतु शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनी चुकून तिचे दोन्ही अंडाशयही (ovaries) काढून टाकले. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी स्वतःहून ही गंभीर चूक मान्य केली असून, याला त्यांनी “एखाद्या नवशिक्याकडून व्हावी तशी चूक” असे संबोधले आहे.
कुठे घडली ही घटना?
ही घटना चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग (CUHK) मेडिकल सेंटरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी एका ४५ वर्षीय महिलेवर सर्जरी करण्यात आली. तिला गर्भाशयाच्या आतील अस्तराशी संबंधित एक असामान्य स्थिती असल्याचे निदान झाले होते. यामुळे डॉक्टरांनी तिचे गर्भाशय आणि फॅलोपियन नळ्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्जरीदरम्यान एक चूक झाली.
नेमकं काय घडलं?
ही चूक म्हणजे या सर्जरीमध्ये तिचे दोन्ही अंडाशयही काढून टाकण्यात आले, जे मूळ सर्जरीचा भाग नव्हते. ही सर्जरी प्राध्यापक चेउंग टाक-हाँग यांच्याद्वारे केली जात होती. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ (SCMP) शी बोलताना त्यांनी आपली चूक मान्य केली. या चुकीबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, ही सर्जरी काहीशी गुंतागुंतीची होती. ते एका विशिष्ट बाबीवर इतके अधिक लक्ष केंद्रित करत होते की, त्यांना आधी ठरवलेली सर्जरीची रणनीती विसरली गेली. चेउंग म्हणाले, “ही सर्जरी अत्यंत कठीण होती. माझे लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर होती. मी त्यावरच खूप जास्त केंद्रित झाले होते. या प्रक्रियेत, मूळ प्लॅन माझ्या लक्षात राहिला नाही.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, या चुकीसाठी त्यांच्याकडे कोणतेही समर्थन किंवा सबब नाही. एखादी चूक झाली असेल, तर ती मान्य करणे आणि तिची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
कोण आहेत चेउंग टाक-हाँग?
‘द स्ट्रेट्स टाइम्स’च्या वृत्तानुसार, चेउंग हे प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत. ते विशेष म्हणजे ‘गायनेकोलॉजिकल ऑन्कोलॉजी’वर काम करतात. ते सीयूएचके (CUHK) मध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहे. याशिवाय ते विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेत मानद क्लिनिकल प्राध्यापकही आहेत. सध्या, या डॉक्टरांविरुद्ध कोणती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. खुद्द चेउंग यांनीही असे म्हटले आहे की, या प्रकरणातील पुढील कारवाईबाबतीत अद्याप कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही.
