लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांचा अजब फतवा, एका निर्णयानं लोकांत संतापाची लाट!

रशियात एक अजब असा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्यावाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून काही लोक या योजनेला विरोध करत आहेत.

लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांचा अजब फतवा, एका निर्णयानं लोकांत संतापाची लाट!
vladimir putin
| Updated on: Jul 14, 2025 | 4:26 PM

Russia Pregnancy Scheme : जगभरात वेगवेगळ्या देशांत स्थानिक नियम वेगळे आहेत. त्या-त्या देशातील सामाजिक, आर्थिक परिणाम लक्षात घेऊन तेथील सरकार आपले धोरण ठरवत असते. आता रशियाने मात्र एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे मात्र व्लादिमीर पुतनी यांच्यावर जगभरातून टीका केली जात आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय लोकसंख्यावाढीसंदर्भात आहे.

लोकसंख्यावाढीचा दर स्थिर राहावा म्हणून…

गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसेच आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान फक्त एवढ्यावरच शिल्लक राहिलेले नाही. तर त्याचे काही सामाजिक परिणामही झाले आहेत. या युद्धात रशियाचे आतापर्यंत लाखो तरुण सैनिक मारले गेले आहेत. याच युद्धाच्या परिणामाचा आणखी एक भाग म्हणून तेथील लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. त्यामुळेच तेथील लोकसंख्यावाढीचा दर स्थिर असावा म्हणून एक निर्णय घेतला आहे. रशियात एक योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी (अल्पवयीन मुली) गर्भवती राहिल्यास चक्क लाखोंचे बक्षीस दिले जात आहे.

मिळणार एक लाख रुपये

तेथील रशियन सरकारने एक घोषणा केली आहे. या घोषणेनुसार उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास तेथे चक्क एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. थोडक्यात तेथे विद्यार्थिनींना गर्भवती राहण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास…

रशियातील मॉस्को टाइम्स आणि फॉर्च्यून रिपोर्टनुसार रशियामधील केमेरोवो (Kemerovo), कारेलिया (Karelia), ब्रायन्स्क (Bryansk), ओरयॉल (Oryol), टॉम्स्क (Tomsk) या प्रदेशात ही योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत एखादी विद्यार्थिनी कमीत कमी 22 आठवड्यांची गर्भवती असेल आणि त्या विद्यार्थिनीचे नाव शासकीय प्रसूतीगृहात नोंदणीकृत असेल तर तिला तब्बल 1 लाख रुबल म्हणजेच साधारण एक लाख रुपये दिले जातील.

रशियन सरकारने हा निर्णय का घेतला?

रशियात लोकसंख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी तेथील काही लोकांनी याला विरोध केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या रिपोर्टनुसार या योजनेसंदर्भात रशियातील पब्लिक ओपिनीयन रिसर्च सेंटरद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत साधारण 43 टक्के रशियन नागरिकांनी या योजनेला पाठिंबा दिला आहे. तर 40 टक्के लोकांनी या योजनेचा विरोध केलाय. किशोरावस्थेत गर्भवती राहण्यास प्रोत्साहित केल्यामुळे नैतिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहतील, असे तेथील काही नागरिकांचे मत आहे.

सरकार योजना रद्द करणार का?

तर दुसरीकडे रशियातील लोकसंख्यावाढीसाठी हा निर्णय गरजेचा आहे, असे काही लोकांचे मत आहे. रशियात लोकसंख्यावाढीचा वेग कायम ठेवायचा असेल तर तेथे प्रजननचा दर 2.05 असणे गरजेचे आहे. मात्र 2023 साली हा दर प्रति महिला केवळ 1.41 एवढाच आहे. त्यामुळे आता रशियात ही योजना रद्द केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.