आता अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध? समोर आलं मोठं कारण, अमेरिकेकडून आपल्या दोन सर्वात जवळच्या मित्रांना मदतीचं आवाहन

इराण आणि इस्रायलमध्ये झालेल्या युद्धानंतर आता अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध सुरू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याला कारण देखील तसंच आहे. अमेरिकेकडून आपल्या सर्वात जवळच्या दोन मित्रांना मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.

आता अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध? समोर आलं मोठं कारण, अमेरिकेकडून आपल्या दोन सर्वात जवळच्या मित्रांना मदतीचं आवाहन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2025 | 4:49 PM

इराण आणि इस्रायलमध्ये झालेल्या युद्धानंतर आता अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध सुरू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याला कारण देखील तसंच आहे. अमेरिकेकडून आपल्या सर्वात जवळच्या दोन मित्रांना थेट असा सवाल करण्यात आला आहे की, जर तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेचं चीनसोबत युद्ध झालं तर त्यांची भूमिका काय असेल? हे दोन्ही देश इंडो- पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेचे प्रमुख सहकारी आहेत, सोबतच क्वाड अलायन्सचे सदस्य देखील आहेत. भारत देखील क्वाड अलायन्सचा सदस्य आहे. अमेरिकेच्या या प्रश्नानंतर आता रशिया -युक्रेन, इस्रायल -हमास आणि इराण-इस्रायल या युद्धानंतर जग आता आणखी एक युद्ध पाहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे?

तैवानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनमधील संघर्ष खूप जुना आहे. तैवानच्या सुरक्षेची आपण गॅरंटी घेतल्याचं अमेरिका जगाला दाखवू इच्छित आहे. मात्र तैवानला सुरक्षा पुरवण्या मागं अमेरिकेचा मोठा स्वार्थ दडलेला आहे. तैवान रिलेशन अॅक्ट (1979) अनुसार अमेरिका तैवानला युद्ध सामुग्रीचा पुरवठा करते. अलिकडच्या काळात तर शस्त्रांच्या निर्यातीमध्ये अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

मात्र दुसरीकडे तैवानबाबत अमेरिकेची सध्याची जी भूमिका आहे, ती काही प्रमाणात दुटप्पी असल्याचं पाहायला मिळत आहे, एकीकडे जर तैवानच्या मुद्द्यावर चीनसोबत युद्ध झालं तर तुमची भूमिका काय असणार असा थेट प्रश्न अमेरिकेनं आपल्या सर्वात जवळच्या दोन मित्र राष्ट्रांना विचारला आहे, मात्र दुसरीकडे जर समजा उद्या चीन आणि तैवानमध्ये युद्ध पेटलचं तर अमेरिका सैन्य कारवाई करणार का? याबाबत कुठलीही ठोस भूमिका अद्याप अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये, तज्ज्ञाच्या मते चीनला थोपवण्यासाठी आणि तैवानला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची ही रणनीती असू शकते.

अमेरिकेकडून चीन सोबत युद्ध झाल्यास तुमची भूमिका काय असणार? असा थेट सवाल आपले मित्र राष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि जपानला विचारण्यात आला आहे. मात्र सध्या तरी कोणत्याही युद्धात अडकायचं नाही, अशीच या दोन देशांची भूमिका दिसून येते, या दोन्ही देशांनी अमेरिकेच्या या प्रश्नावर अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये.