Iran Israel Conflict : हजारो भारतीय अडकले, सरकारचा रातोरात मोठा निर्णय, मास्टरप्लॅन काय?

पश्चिम आशियातील संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने २७९ उड्डाणे रद्द झाली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एअर इंडिया ७८ अतिरिक्त उड्डाणे चालवणार असून सरकार विमान भाड्यावर लक्ष ठेवून आहे.

Iran Israel Conflict : हजारो भारतीय अडकले, सरकारचा रातोरात मोठा निर्णय, मास्टरप्लॅन काय?
Iran Israel conflict Air travel
| Updated on: Mar 09, 2026 | 7:35 AM

सध्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इस्रायल, इरान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे थेट परिणाम भारतीय विमान वाहतुकीवर होताना दिसत आहेत. सध्या या देशातील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी (८ मार्च) भारतीय विमान कंपन्यांची तब्बल २७९ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. या संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाने आता विशेष पावले उचलली आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक विमानांच्या उड्डाणांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचा सर्वाधिक परिणाम रविवारी मुंबई विमानतळावर दिसून आला. यात ३४ जाणारी आणि ३२ येणारी अशी एकूण ६६ विमान उड्डाणे रद्द करावी लागली. पश्चिम आशियातून भारतात येणाऱ्या एकूण ४९ नियोजित विमान उड्डाणांवरही याचा मोठा परिणाम झाला.

प्रवाशांसाठी महत्त्वाचे अपडेट्स काय?

संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एअर इंडियाने १० ते १८ मार्च दरम्यान नऊ आंतरराष्ट्रीय मार्गांवर ७८ अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ९ मार्च रोजी साधारण ५० विमान उड्डाणे चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. पण परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांच्या संपर्कात राहून उड्डाणांच्या ताज्या स्थितीची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विमान भाडेवाढ रोखण्यासाठी सरकारचे निर्देश

केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सध्या आखाती देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच विमान तिकिटांच्या किमतीत अचानक आणि भरमसाठ वाढ होऊ नये, यासाठी मंत्रालय विमान कंपन्यांच्या सतत संपर्कात आहे. प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणता यावे, ही सरकारची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

१. स्टेटस तपासा: विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर उड्डाणाची स्थिती तपासा.
२. संपर्क: एअर इंडिया, इंडिगो किंवा स्पाइसजेटच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा.
३. रिफंड: उड्डाण रद्द झाल्यास रिफंड किंवा पर्यायी उड्डाणाच्या नियमांची माहिती विमान कंपनीकडून घ्या.

दरम्यान शनिवारी देखील या प्रदेशातून आलेल्या ५१ उड्डाणांद्वारे सुमारे ८,१७५ प्रवाशांनी प्रवास केला होता. सध्या इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट आणि आकाशा एअर या कंपन्या दुबई, अबु धाबी, मस्कत आणि जेद्दाह सारख्या शहरांमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

Follow Us