
Shahbaz Sharif in Trouble : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना मोठा झटका बसला. एकतर ट्रम्प यांनी त्यांना ताटकाळत ठेवले. तर काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या सत्रात त्यांची त्रेधात्रिपीट दिसून आली. महासभेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांना माध्यमांनी घेरले आणि पाक पुरस्कृत दहशतवाद (Cross-border terrorism) कधी थांबवणार असा सवाल भारतीय वृत्तसंस्था एशियन न्यूज इंटरनॅशनलने (ANI) आणि इतरांनी त्यांना विचारला. तेव्हा ते गडबडले आणि नंतर त्यांनी वायफळ बडबड केली. ते संतापलेले दिसले.
संतापले मग सावरले, काय दिले उत्तर?
नियंत्रण रेषेपलिकडील दहशतवाद कधी थांबवणार असे विचारताच शरीफ गडबडले. मग ते संतापले. त्यानंतर या धक्क्यातून सावरत त्यांनी उत्तर दिले. आम्ही दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दहशतवाद्यांना हरवणार असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर एनआयएच्या पत्रकाराने त्यांना, पाकिस्तानी पीएम, भारताने तुम्हाला हरवले आहे, हरवत आहे, अशी टिप्पणी केली. त्यावर मात्र त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि ते तडक पुढे गेले.
#WATCH | New York | “We are defeating cross-border terrorism. We are defeating them,” says Pakistan PM Shehbaz Sharif when asked by ANI about cross-border terrorism as he enters the UN pic.twitter.com/pnCeYqZdNp
— ANI (@ANI) September 26, 2025
पाकिस्तानच दहशतवाद्यांचे माहेरघर
पाकिस्तान दहशतवाद्यांचे माहेरघर आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना रसद पुरवतो. लष्कराकडून प्रशिक्षण देतो. शस्त्रास्त्र देतो. भारताविरोधात हल्ले करण्यासाठी पैसा पुरवतो. दहशतवाद्यांसाठी अनेक ठिकाणी बंकर आणि केंद्र त्याने उघडल्याचे अनेकदा उघड झाले आहे. भारताने उरी आणि पहलगाम हल्ल्यानंतर पाकव्याप्त आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी केंद्रांवर हल्ला चढवला. त्यात अनेक दहशतवादी आणि त्यांचे आका मारल्या गेले. त्यावेळी पाकिस्तानी नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी उर बडवल्याचे उभ्या जगाने पाहिले. पाकिस्तान किती नकार देत असला तरी त्याचे पितळ अनेकदा उघडं पडलं आहे. पाक दहशतवाद्यांना आश्रय देतो हे समोर आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरने मोडले कंबरडे
7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला लष्कराने हे प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला. त्यात अनेक दहशतवादी आणि त्यांचे कुटुंबिय मारल्या गेले. त्यांच्या दफनविधी कार्यक्रमात लष्कराचे बडे अधिकारी आणि पाकिस्तानी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.