फाशीची शिक्षा मिळालेल्या शेख हसीना कोण आहेत? नेमका गुन्हा काय? वाचा…
Sheikh Hasina : शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत. त्यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी आढळल्याने बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Who is Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने शेख हसीना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी ठरवले असून त्यांना मृत्यु दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून शेख हसीना भारतात आहेत, मात्र आता बांगलादेशात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. शेख हसीना नेमक्या कोण आहेत? त्यांना भाशीची शिक्षा का सुनावण्यात आली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोण आहेत शेख हसीना?
शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी ढाका येथे झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. हसीना यांनी पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथील शाळेत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात शेख हसीना यांना राजकारणाची फारशी आवड नव्हती. मात्र 1966 साली ईडन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्या राजकारणात उतरल्या. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवत त्या उपाध्यक्ष बनल्या. नंतर त्यांनी अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व केले.
1975 साली शेख हसीना यांच्या कुटुंबावर संकट
1975 हे वर्ष शेख हसीना यांच्यासाठी खूप खराब होते. सैन्याने बंड करत त्यांच्या कुटुंबाविरुद्ध उठाव केला. यावेळी झालेल्या चकमकीत शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान, आई आणि तीन भाऊ यांचा मृत्यू झाला. शेख हसीना त्यांचे पती वाजिद मिया आणि धाकटी बहीण हे युरोपमध्ये होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना आश्रय दिला. त्या दिल्लीत 6 वर्षे राहिल्या.
1981 मध्ये मायदेशी परतल्या
शेख हसीना 1981 साली बांगलादेशात परत गेल्या. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या पक्षाचा विस्तार करण्याचे ठरवले. 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 1991 मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले नाही. 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांना बहुमत मिळाले आणि त्या पंतप्रधान झाल्या. 2001 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2009 मध्ये त्या दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्या. 2014 मध्ये तिसऱ्यांदा, 2018 मध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या. 2024 मध्ये त्यांना पाचव्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
फाशीची शिक्षा का झाली?
शेख हसिना पंतप्रधान असताना जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठा हिंसाचार झाला होता. आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसिना यांनी लष्कर, पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता. या कारवाईत 1400 लोकांचा मृत्यू झाला होता. आता याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्यूनलने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण काय आहे? (What is ICT)
बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) द्वारे नायदानाचे काम केले जाते. सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. ती दिवाणी, फौजदारी, संवैधानिक आणि दैनंदिन बाबींची सुनावणी करते. तर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) हे एक विशेष न्यायालय आहे, ज्यात फक्त गंभीर गुन्ह्यांची सुनावणी पार पडते. यात युद्धशी संबंधित गुन्हे, नरसंहार आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे यांचा समावेश आहे. या न्यायालयात विशेष न्यायाधीश न्यायदानाचे काम करतात. याच न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
