उस्मान हादी कोण? ज्याच्या मृत्यूमुळे लोक भारतावर खवळले, बांगलादेशात मोठ्या प्रमाणात जाळपोळ
शरीफ उस्मान हादी हे बांगलादेशातील 'इन्किलाब मंच'चे प्रमुख नेते आणि २०२४ च्या आंदोलनाचा चेहरा होते. ढाका विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या हादी यांच्या राजकीय प्रवासावर आणि वादांवर टाकलेला हा विशेष प्रकाशझोत.

बांगलादेशातील जुलै क्रांतीचे प्रमुख तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले. हादी यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरली असून हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी हादी यांच्यावर गोळीबार केला होता, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारानंतर त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पण शरीफ उस्मान हादी नक्की कोण होते आणि त्यांच्यामुळे बांगलादेशात इतकी खळबळ का उडाली आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
शरीफ उस्मान हादी नक्की कोण?
२०२४ मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनात शरीफ उस्मान हादी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते इन्किलाब मंच या संघटनेचे प्रवक्ते आणि समन्वयक होते. याच आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. तसेच त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. या क्रांतीनंतर हादी हे बांगलादेशातील तरुणांचे एक शक्तीशाली नेते म्हणून समोर आले होते.
शरीफ उस्मान हादी यांचा जन्म झालोकाठी जिल्ह्यातील नलछिटी उपिल्ला येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील मदरसा शिक्षक आणि स्थानिक इमाम होते. हादी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण झालोकाठी एन. एस. कामिल मदरसा येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ढाका विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. पदवीधर झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणात उतरले होते. देशात फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी हादी यांनी आपली तयारी सुरू केली होती. ते ढाका-८ या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होते.
शरीफ उस्मान हादी हे त्यांच्या कट्टरपंथी विचारांमुळे आणि विधानांमुळे अनेकदा वादात राहिले होते. त्यांनी काही काळापूर्वी ग्रेटर बांग्लादेशचा एक नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता. या नकाशामध्ये भारताचा काही ईशान्येकडील भूभाग बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता, ज्यावरून भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या इन्किलाब मंचवर अनेकदा कट्टरपंथी असल्याचा आरोपही करण्यात आला.
बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता
दरम्यान हादी हे आपल्या मतदारसंघात प्रचार करुन रिक्षाने घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. १२ डिसेंबर रोजी ढाका येथील पलटन भागात हादी हे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षातून प्रवास करत असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने ढाका मेडिकल कॉलेज आणि नंतर एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने १५ डिसेंबर रोजी त्यांना एअरलिफ्ट करून सिंगापूरमधील ‘सिंगापूर जनरल हॉस्पिटल’ (SGH) मध्ये हलवण्यात आले होते. न्यूरोसर्जिकल आयसीयूमध्ये सहा दिवस त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर १८ डिसेंबर २०२५ रोजी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. यानंतर संपूर्ण बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
