
तुम्हाला आधार कार्डचा नवा नियम माहिती आहे का? नसेल माहिती तर आज आम्ही तुम्हाला आधारच्या नव्या नियमांविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. आता तुम्हाला फिजिकल आधार कार्ड वापरण्याची गरज नाही. हो. त्यामुळे आता तुमचं टेन्शन एकप्रकारे कमी होऊ शकतं. पण, हा नवा नियम नेमका काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत केंद्र सरकारने आधार कार्ड अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन आधार अॅप लाँच केले आहे. हे अॅप सध्या चाचणीच्या टप्प्यात असून सर्व काही सुरळीत राहिल्यास लवकरच हे अॅप देशभरात वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून आता तुम्हाला कुठेही फिजिकल आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी बाळगण्याची गरज भासणार नाही.
नवीन आधार अॅप कसे काम करेल?
या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा QR कोड आणि फेस आयडीद्वारे व्हेरिफिकेशन. ज्याप्रमाणे आपण डिजिटल पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करतो, त्याचप्रमाणे QR कोड स्कॅन करूनही आधार ओळखता येतो. तसेच, फेस आयडीद्वारे युजर्सला त्वरीत आणि सुरक्षितपणे ओळखले जाऊ शकते.
फोटो कॉपी आणि कार्डचा त्रास दूर
आता हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी, कोणतेही सरकारी काम करण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान ओळख दाखवण्यासाठी आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. हे नवीन अॅप पूर्णपणे डिजिटल असून तुमची माहिती तुमच्या परवानगीनेच शेअर केली जाईल.
गोपनीयता आणि सुरक्षा मजबूत
UIDAI च्या या उपक्रमामागील सर्वात मोठा विचार आधार डेटा अधिक सुरक्षित करणे हा आहे. या अॅपच्या माध्यमातून युजरला कधी आणि किती डेटा शेअर करायचा आहे हे जाणून घेण्याचा अधिकार असेल. अॅपमधील आपली वैयक्तिक माहिती तुमच्या संमतीशिवाय कोणालाही शेअर केली जाणार नाही.
काय म्हणाले आयटी मंत्री अश्विनी वैष्णव?
8 एप्रिल 2025 रोजी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या अॅपशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. ते म्हणाले की, हे अॅप युजर्सच्या गोपनीयतेला प्रोत्साहन देईल आणि आधार डेटाचा गैरवापर किंवा लीक होण्याची शक्यता दूर करेल.
एका नजरेत ‘या’ अॅपचे फायदे
फिजिकल कार्डची गरज दूर होईल
QR कोड आणि फेस आयडीपेक्षा व्हेरिफिकेशन जलद आणि सोपे होईल
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित असेल
आपल्या माहितीवर आपले पूर्ण नियंत्रण असेल