असा एक देश जिथे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर लोक नाचतात, मेजवानी ठेवतात, उत्सव करतात; ऐकून तुम्हालाही वाटेल नवल
घानात मृत्यूला उत्सवासारखे साजरे केले जाते. मोठी पार्टी, नाचगान आणि चांगले कपडे हे याचे वैशिष्ट्य. मृताच्या कुटुंबीयांना समाजात त्यांच्या प्रतिष्ठेचा दर्शनासाठी ही पार्टी आयोजित करतात. लग्नापेक्षाही जास्त खर्च अंत्यसंस्कारावर केला जातो.

भारतात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंब, नातेवाईक, शेजारी-पाजारी सर्वजण दुःखात बुडून जातात. आपला जवळचा व्यक्ती सोडून गेल्याच्या दु:खात आपल्या डोळ्यात सहज पाणी येतं. त्यानंतर अतिशय शांतपणे आणि विधिपूर्वक त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. पण तुम्हाला माहितीये का, याच्या अगदी उलट चित्र पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात आहे. या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो क्षण एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. मोठी पार्टी दिली जाते आणि जल्लोषही केला जातो.
फ्यूनरल पार्टीचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या घाना देशाच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने सध्या या अनोख्या परंपरेची जोरदार चर्चा सुरू आहे. घानामध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर आनंद साजरा करण्याची पद्धत खूपच जुनी आहे. या ठिकाणी निधन झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय ‘फ्यूनरल पार्टी’ देतात. या पार्टीत लोक चांगले कपडे घालून येतात. नाच-गाणं केलं जातं. भरपूर खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली जाते. तसेच कुटुंबातील सदस्य निधन झालेल्या व्यक्तीचा फोटो असलेले कपडे परिधान करतात. तसेच घरात एका टेबलावर त्याचा फोटो ठेवतात आणि सगळेजण मनसोक्त मजा करतात.
घानामध्ये असं मानले जाते की, एखाद्याच्या अंत्यसंस्कारात जेवढी जास्त गर्दी होते, तेवढा तो माणूस समाजात चांगला, मदत करणारा आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणारा होता. त्यामुळेच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी इतके लोक जमा झालेले आहेत. याचाच अर्थ जेवढे जास्त लोक अंत्यसंस्कारावेळी जमा होतील, तेवढा तो व्यक्ती चांगला असल्याचे समजले जाते.

लग्नापेक्षा जास्त खर्च अंत्यसंस्कारावर
घानामध्ये अंत्यसंस्काराचा खर्च खूप जास्त असतो. घाना देशात जितका खर्च लग्नावर केला जातो, तेवढाच किंवा कधीकधी त्याहून जास्त पैसा अंत्यसंस्कारावर खर्च केला जातो. घानामध्ये अशा पार्ट्यांसाठी खास लोक असतात. जे सगळी व्यवस्था करतात. पार्टीत येणाऱ्यांना जेवण, पाणी, संगीत आणि नाचण्याची सोय असेल अशी अपेक्षा असते. या कार्यक्रमांमध्ये सहसा काळे आणि लाल रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे.
घानामध्ये शवपेट्या खूप रंगीबेरंगी असतात. त्यावर मृताच्या आवडीच्या गोष्टींचे किंवा त्याच्या व्यवसायाचे चित्र काढलेले असते. कधीकधी तर शवपेटीचा आकारही बदललेला असतो. जर एखाद्या सुताराचा मृत्यू झाला तर हातोड्याच्या आकाराची शवपेटी किंवा एखादा मोची असेल तर बुटाच्या आकाराची शवपेटी असते. तसेच या ठिकाणी विमानासारख्या आकाराच्या शवपेट्याही पाहायला मिळतात.

टीकेनंतरही परंपरा कायम
घाना देशातील या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवर अनेकदा टीकाही झाली. मात्र तरीही ही परंपरा कायम आहे. या अंत्यसंस्कारांवरील जास्त खर्चावरून काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी टीका केली होती. “आपण जिवंत लोकांपेक्षा मृतांवर जास्त पैसे खर्च करत आहोत, हे चुकीचं आहे. मृतांसाठी असं काहीतरी करा, ज्यामुळे जिवंत लोकांना फायदा होईल.” अशी टीका केली जाते.

मात्र या सगळ्या टीकेनंतरही घानामधील लोकांमध्ये आणि त्यांच्या परंपरांमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की, जन्माला आलेल्या बाळाच्या आणि जग सोडून गेलेल्या व्यक्तीच्या उत्सवात कोणतीही कमी नसावी. अर्थात, ते लोक अंत्यसंस्काराच्या वेळी रडणं, प्रार्थना करणं हे विधीही करतात. अनेक दुःखी कुटुंबे चर्चमध्ये प्रार्थना करतात. पण बाकीचे विधी मात्र पार्टीच्या स्वरूपात साजरे केले जातात. घानामधील लोकांची अशीही समजूत आहे की, शोक करणारे लोक जर नाचत आणि मजा करत असतील, तर मृत व्यक्तीही आनंदी असतो. यामुळेच ही अनोखी परंपरा आजही कित्येक वर्षांपासून तिथे टिकून आहे.
