लक्ष्मी मातेचं हे अनोखं मंदिर; जिथे प्रसाद म्हणून देतात सोनं-चांदीचे दागिने किंवा नाणी; कुठे आहे हे मंदिर?
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील मानक येथील महालक्ष्मी मंदिर आपल्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथे देवी लक्ष्मीला अर्पण केलेले सोने-चांदीचे दागिने आणि नाणी भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात. या मंदिराचा इतिहास प्राचीन असून, राजे-महाराजे या ठिकाणी संपत्ती अर्पण करत असत. दिवाळी आणि धनतेरस या सणांदरम्यान येथे विशेष उत्सव साजरे केले जातात.

भारतात हजारो मंदिरे आहेत, जी त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आणि श्रद्धांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक मंदिराची स्वतःची खासियत असते, जी ते इतर मंदिरांपेक्षा वेगळे बनवते. काही मंदिरांमध्ये एक विशेष पूजा पद्धत असते, तर काही मंदिरांमध्ये प्रसादाचे विशेष महत्त्व असते. मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील मानक येथे असलेले महालक्ष्मी मंदिर देखील असंच एक अद्भुत मंदिर आहे, ज्याची परंपरा कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. येथे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि भक्तांना प्रसाद म्हणून सोने आणि चांदी वाटली जाते. होय, मंदिरात चक्क सोनं-चांदी प्रसाद म्हणून दिले जातात.
मंदिराची खासियत जाणून घ्या
मध्य प्रदेशातील रतलाम येथील मानक येथे असलेले हे खास मंदिर देवी लक्ष्मीला समर्पित आहे. ते ‘महालक्ष्मी मंदिर’ म्हणून ओळखले जाते. येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. असे मानले जाते की देवी लक्ष्मीच्या कृपेने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या इच्छा पूर्ण होतात. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे सोने-चांदीचे दागिने आणि नाणी प्रसाद म्हणून दिली जातात. भक्त हा प्रसाद सुख-समृद्धीचे प्रतीक मानून त्यांच्या घरात मोठ्या आदराने ठेवतात.
मंदिराचा इतिहास खूप जुना आहे
या महालक्ष्मी मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळी राजे आणि सम्राट राज्याच्या समृद्धीसाठी आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मीच्या चरणी सोने, चांदी आणि मौल्यवान दागिने अर्पण करत असत. काळानुसार या मंदिरात ही परंपरा आजही जिवंत आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की माता लक्ष्मीला अर्पण केलेले दागिने आणि पैसा त्यांच्या जीवनात समृद्धी आणतो. म्हणूनच आजही लोक या मंदिरात माता लक्ष्मीच्या चरणी दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू भक्तीभावाने अर्पण करतात.
सोन्या-चांदीने सजवलेले महालक्ष्मी मंदिर
तसेच महालक्ष्मी मंदिराची सजावट खूपच अनोखी आहे. या मंदिराच्या भिंती आणि गाभारा फुले आणि दिव्यांनी सजवलेले नसून सोने, चांदी आणि पैशांनी सजवलेला पाहायाला मिळतो. दिवाळीच्या वेळी मंदिराचे सौंदर्य आणखी वाढते. या काळात मंदिरातील कुबेराचा दरबार अतिशय वेगळ्या पद्धतीने सजवला जातो. या काळात मंदिराभोवती सोन्या-चांदीचे दागिने आणि नोटांची सजावट दिसते. दीपोत्सवाच्या पाच दिवसांसाठी येथील दृश्य खूपच अद्भुत असते.
दिवाळीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.
दिवाळी आणि धनतेरस दरम्यान मध्य प्रदेशातील महालक्ष्मी मंदिरात एक विशेष उत्सव आयोजित केला जातो. या काळात मंदिर 24 तास उघडे असते आणि दूरदूरहून भाविक येथे येतात. असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी महिलांना ‘कुबेर की पोटली’ प्रसाद म्हणून दिली जाते. ही पोटली संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.
एका अद्भुत परंपरेचे महत्त्व
दशकांपासून चालत आलेल्या या परंपरेमुळे महालक्ष्मी मंदिराला देशभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्रत्येक भक्ताला येथून प्रसाद म्हणून नक्कीच काहीतरी दिले जाते. सोने किंवा चांदी दिली नसली तरी इतर वस्तू प्रसाद म्हणून दिल्या जातात. या अद्भुत परंपरेमुळे हे मंदिर लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे.
