डाळ शिजवण्याआधी इतकावेळ ठेवा पाण्यात भिजत, आरोग्यास मिळतील अधिक फायदे
तंदुरस्त राहण्यासाठी डाळींचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे नेहमीच उचित असते. कारण डाळींमध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यासोबतच डाळ शिजवण्याची पद्धत देखील खूप महत्वाची आहे. डाळ शिजवण्या आधी कोणत्या डाळी किती वेळ पाण्यात भिजवावी? तसेच पाण्यात भिजवणे का आवश्यक आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करत असतो. त्यात सगळयात पौष्टिक म्हणजे डाळ. कारण डाळ ही भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यात डाळींपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आहारात समाविष्ट केले जातात. तुरडाळ, मुगडाळ, मसुरडाळ, चणाडाळ अशा अनेक प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश केला जातो. कारण या डाळींमध्ये प्रथिने आणि अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा स्रोत असते. प्रत्येक डाळ त्याच्या वेगवेगळ्या पौष्टिकतेसाठी ओळखली जाते. तर अनेकदा मुलांना दुधाव्यतिरिक्त डाळींचे पाणी देखील दिले जाते. त्यातच काही लोकांना डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस आणि जडपणा जाणवतो.
अशातच डाळ बनवण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. जर ती जास्त मसाले आणि तेल यांचा वापर करून बनवली तर आरोग्याला फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकते. याशिवाय स्वयंपाक करण्यापूर्वी डाळ काही वेळ पाण्यात भिजत ठेवावी,असे म्हटले जाते. पोषणतज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी स्वयंपाक करण्याआधी डाळ भिजवणे का महत्त्वाचे आहे आणि कोणती डाळ किती वेळ भिजवावी हे देखील सांगितले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
डाळ भिजवणे का आवश्यक आहे?
पोषणतज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये स्वयंपाक करण्याआधी डाळ पाण्यात भिजवण्याचे काही फायदे सांगितले आहेत. ज्यामध्ये असे सांगितले आहे की डाळीमध्ये नैसर्गिकरित्या फायटिक ॲसिड आणि टॅनिन असतात जे लोह, जस्त आणि कॅल्शियमचे शोषण रोखतात. अशावेळेस डाळ शिजवण्याआधी काही तास भिजवल्याने फायटिक ॲसिड आणि टॅनिन पोषण तत्वांचे शोषण कमी करतात. डाळीमध्ये ऑलिगोसॅकराइड्स नावाची साखर असते जी आपले पोट पचवू शकत नाही, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते आणि जर डाळ शिजवण्यापूर्वी भिजवली तर त्यातील साखर कमी होते जी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्याच बरोबर डाळ पाण्यात भिजवल्याने त्यातील एंजाइम सक्रिय होतात, आणि ज्यामुळे प्रथिने, बी-जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक जैवउपलब्ध होतात. तसेच, डाळ प्रथम पाण्यात भिजवल्याने ते लवकर तयार होते. तसेच, पोषक तत्वे देखील अबाधित राहतात.
कोणती डाळ किती वेळ भिजवावी?
मूग डाळ, लाल मसूर आणि तूर डाळ शिजवण्याआधी 30 मिनिटे पाण्यात भिजवावी. मूगडाळ, उडीदडाळ आणि चण्याची डाळ 2 ते 4 तास भिजवावी. शिजवण्याआधी अख्खे मूग, अख्खे मसूर, अख्खे उडीद, हे 6 ते 8 तास भिजवावे. तर राजमा, पांढरे चणे आणि काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवावेत. यासोबतच, राजमा किंवा चणे शिजवताना, तमालपत्र, मोठी वेलची आणि मिरची टाकावी यामुळे त्याचा जडपणा कमी होतो आणि पचन होण्यास मदत होते.
