या देशात जाड मुलींनाच वधू म्हणून पसंती; तर बारीक मुलींना मानले जाते अशुभ
असा एक देश आहे जिथे जाड मुलींना समुद्धीचं प्रतिक मानलं जातं. तसेच या जाड मुलींनाच वधू म्हणून पसंती दिली जाते. तर बारीक मुलींना अशुभ मानले जाते आणि तिला लहानपणापासूनच जास्त खायला दिलं जातं.

प्रत्येकाच्या सौंदर्याचे मानक वेगवेगळे असतात. काही लोकांना बारीक लोक आवडतात. काहींना जाड लोक आवडतात. काहींना उंच लोक आवडतात. काहींना कमी उंचीचे लोक आवडतात.पण सध्याचा ट्रेंड पाहता मुलींमध्ये विशेषत: पाहायल मिळतो. मुलींना बारीक व्हायला, सडपातळ दिसायला आवडतं त्यासाठी मुली अनेक डाएट, वर्कआउट करतात. जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न ठरते तेव्हा तर त्या आपल्या शरीराकडे अजून लक्ष देतात. जीम किंवा योगा क्लासेस करतात. पण असा एक देश आहे जिथे लग्नासाठी जाड मुलींना पसंत केलं जातं. होय, एवढंच नाही तर बारीक मुलींना जाड बनवण्यासाठी जबरदस्तीने जास्त खायला सांगितलं जातं.
या देशातील कुटुंबे लहानपणापासूनच मुलींना जास्त जेवण देण्यास सुरुवात करतात
या देशात मुली बारीक असतील तर कोणीही त्यांच्याशी लग्न करत नाही. म्हणूनच तिथल्या मुलींना लहानपणापासूनच त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष दिले जाते जेणेकरून त्या खूप जाड होतील.हा देश आहे आफ्रिकन देश मॉरिटानिया. या देशातील लोकांना जाड मुली आवडतात. मॉरिटानियाच्या जुन्या रीतिरिवाजांनुसार, या देशात मुलींची संपत्ती आणि प्रतिष्ठा खूप जास्त पाहिली जाते. आणि हेच कारण आहे की या देशातील कुटुंबे लहानपणापासूनच मुलींना जास्त जेवण देण्यास सुरुवात करतात. जेणेकरून ती मोठी झाल्यावर तिचे वजन चांगले राहील. या देशातील लोकांचा असा विश्वास आहे की जर मुलगी जाड असेल तर तिला चांगला नवरा देखील मिळेल. तसेच लग्नासाठी या मुली शुभ असतात आणि घरातही ,समृद्धी आणतात.
या परंपरेला म्हणतात लाब्लू
मॉरिटानियामध्ये या परंपरेला लाब्लू म्हणतात. यामध्ये मुलींना लहानपणापासूनच वजन वाढवण्यासाठी दूध, लोणी आणि उच्च कॅलरीज असलेले इतर पदार्थ दिले जातात. जरी मुलीला जेवायचे नसेल तरी तिला जबरदस्तीने खायला दिले जाते. ही परंपरा या देशात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. देशातील लोकांचा असा विश्वास आहे की जाड वधू कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवते आणि ,समृद्धी आणते.
होत असलेले बदल
जरी मॉरिटानियातील बहुतेक लोक अजूनही मुलींना जाड बनवण्याची परंपरा पाळतात, तरीही काही लोक आता आधुनिकतेनुसार अनेक बदल करत आहेत. जाड असण्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. यामुळे काही ठिकाणी ही परंपरा कमी प्रमाणात पाळली जात असल्याचं दिसून येत आहे.
