
नेपाळमध्ये गेल्या 17 वर्षात 14 वेळा सरकार बदललं आहे. आताही नेपाळमध्ये अराजक निर्माण झालं असून तिथल्या पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनाही राजीनामा द्यावा लागला आहे. यावरून नेपाळ हे किती अस्थिर राष्ट्र आहे हे दिसून येतं. पण इतिहासात डोकावून पाहिलं तर नेपाळ भारताचं एक राज्य बनलं असतं. नेपाळचे तेव्हाचे राजे वीर विक्रम त्रिभुवन शाह यांनी पंडित नेहरूंसमोर नेपाळच्या भारतातील विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. पण नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला होता. जनता पार्टीचं सरकार असताना तत्कालीन उपपंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान बी पी कोईराला यांच्या समोर या प्रस्तावाचा उल्लेख केला होता. ही माहिती ऐकल्यावर कोईराला थोडे अस्वस्थ झाले होते. पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि वातावरण हलके फुलके राहवं म्हणून चंद्रशेखर यांनी विषय बदलला. पण चौधरी चरण सिंह यांनी जे म्हटलं ते चुकीचं नव्हतं.
केवळ चौधरी चरण सिंहच नाही तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. प्रणवदा यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख आहे. प्रणव मुखर्जी यांनी याबाबत पुढे जाऊन लिहिलं आहे. नेहरूंऐवजी हा प्रस्ताव इंदिरा गांधींकडे आला असता तर नेपाळ सुद्धा सिक्कीम प्रमाणेच भारताचं एक राज्य असतं, असं प्रणवदा यांनी म्हटलं होतं.
हवेतला तीर नव्हता
जनता पार्टीचं सरकार असताना चौधरी चरण सिंह आणि कोईराला यांच्या भेटीच्यावेळी माजी पंतप्रधान चंद्रशेखरही उपस्थित होते. चरणसिंह यांचं म्हणणं ऐकून कोईराला त्रस्त झाले होते. त्यामुळे वातावरण थोडं तणावाचं झालं होतं. त्यावेळी चंद्रशेखर यांनी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता आणि चरणसिंह यांच्या समजुतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
असं असलं तरी चंद्रशेखर यांनीही या भेटीचा आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. चंद्रशेखर यांनी चौधरी चरणसिंह यांच्या या विधानावर असहमती दाखवली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र आपल्या आत्मचरित्रात नेपाळच्या राजाने दिलेल्या प्रस्तावाचा उल्लेख केला आहे. नेहरूंकडे प्रस्ताव आला होता. पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता, असं प्रणवदा यांनी म्हटलं आहे. यावरून चौधरी चरणसिंह यांनी हवेत तीर सोडले नव्हते हे स्पष्ट होते.
जीवन जैसा जिया…
‘जीवन जैसा जिया’ या आत्मचरित्रात चंद्रशेखर यांनी हा उल्लेख केला आहे. एकदा बीपी कोईराला हे दिल्लीत आले होते. त्यांना पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी बोलायचं होतं. एका बैठकीनंतर मी मोरारजी देसाईंना म्हटलं की बीपी कोईराला यांना तुम्हाला भेटायचं आहे. कधी भेटता येईल? त्यावर मोरारजी देसाई म्हणाले, आताच बोलवून घ्या. त्यावर मी म्हटलं, नाही. उद्या भेटू. त्यानंतर आम्ही निघू लागलो. तेव्हा चौधरी चरण सिंह म्हणाले की बीपी कोईरालांशी मलाही बोलायचं आहे. त्यावर मी म्हटलं त्यांना दुपारी जेवणासाठीच बोलवा.
बीपी कोईराला यांच्यासमोर चरणसिंह यांनी नेपाळच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा विषय काढला. त्यामुळे जेवणाचा मूडच गेला. चरणसिंह नेपाळची परिस्थिती माहीत नसताना बीपी कोईराला यांना इतिहासाची माहिती देत होते. नेपाळचे राजे त्रिभुवन यांनी नेहरूंना नेपाळचं भारतात विलिनीकरण करून घ्या, अशी गळ घातली होती. नेहरूंनी ही चूक केली नसती तर समस्या निर्माण झाली नसती, असं चरणसिंह म्हणाले. त्यावेळी मी कोईराला यांचा चेहरा पाहिला. ते चरणसिंह यांचं म्हणणं ऐकत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले होते.
तर नेपाळ भारतात असता
या जुन्या प्रसंगाची अनेक दशकानंतर प्रणव मुखर्जी यांनी उजळणी केली होती. प्रणवदा हे नेहरू गांधी कुटुंबाच्या अगदी जवळचे होते. एक कुशल आणि बुद्धिमान राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतीपदही सांभाळलं होतं. त्यांच्या द प्रेसिडेन्शिअल इयर्स या पुस्तकात त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. तत्कालीन राजा वीर विक्रम त्रिभुवन शाह यांनी नेहरूंच्यासमोर नेपाळच्या भारतातील विलनिकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. पण नेहरूंनी तो नाकारला. जर असा प्रस्ताव इंदिरा गांधींकडे आला असता तर आज सिक्कीम सारखाच नेपाळही भारतात असता, असं प्रणवदा यांनी या पुस्तकात म्हटलंय.