HDI यादीत टॉप ३ ‘सुखी’ देश कोणते? वाचा सविस्तर…
जगात सर्वात 'सुखी' लोक कुठे राहतात? जिथे फक्त पैसा नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेला महत्त्व आहे! पण या यादीत अमेरिका किंवा चीनसारख्या महासत्ता का नाहीत? चला, पाहूया कोणते देश आहेत विकासाच्या या शर्यतीत आघाडीवर आणि का!

‘विकसित देश’ म्हणताना आपल्या मनात लगेच अमेरिका, चीन, जर्मनी यांसारख्या महासत्तांची कल्पना येते. पण फक्त पैसा, उद्योग, तंत्रज्ञान किंवा लष्करी ताकद हे विकासाचे मोजमाप नाही. एक खरा ‘विकसित देश’ तोच, जिथे नागरिक आनंदी असतात, त्यांना चांगलं आरोग्य, दर्जेदार शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळतं. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) दरवर्षी ‘ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ (HDI) प्रकाशित करतं, ज्यात देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवी जीवनमानालाही महत्त्व दिलं जातं.
चालू वर्षीच्या 2024 च्या HDI अहवालानुसार, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि आइसलँड हे देश जगातल्या सर्वात जास्त विकसित आणि समाधानी राष्ट्रांमध्ये टॉप ३ वर आहेत. विशेष बाब म्हणजे यात अमेरिका, चीनसारख्या महासत्तांचा समावेश नाही!
HDI म्हणजे काय?
HDI म्हणजे Human Development Index, ज्याला मराठीत मानवी विकास निर्देशांक असे म्हणतात. हा निर्देशांक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे तयार केला जातो आणि तो देशाच्या एकूण विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो. HDI फक्त देश किती श्रीमंत आहे हे दाखवत नाही, तर त्या देशातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या तीन मुख्य बाबींच्या आधारे मानव विकास किती आहे हे दर्शवतो.
1. नॉर्वे
नॉर्वे अनेक वर्षांपासून या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इथली लोकसंख्या कमी असली तरी, प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा मिळते. सरकार नागरिकांच्या मूलभूत गरजांची काळजी घेते. नैसर्गिक ऊर्जा आणि पर्यावरणाचं रक्षण याला इथे खूप महत्त्व आहे. त्यामुळे इथले लोक आनंदी आणि समाधानी जीवन जगतात.
2. स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंड त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच, पण त्यासोबतच तिथल्या उत्तम आरोग्य सुविधा, सुरक्षित बँकिंग प्रणाली आणि कमी गुन्हेगारीसाठीही ओळखला जातो. शिक्षण, वाहतूक व्यवस्था आणि एकूण जीवनमानाचा दर्जा इथे खूप उच्च आहे. नागरिकांना प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता अनुभवायला मिळते.
3. आइसलँड
आइसलँड हा अगदी छोटा, कमी लोकसंख्येचा देश आहे, पण विकासाच्या बाबतीत तो अनेकांच्या पुढे आहे. हा देश खूप शांतताप्रिय आहे. शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः महिला सुरक्षेला इथे खूप महत्त्व दिलं जातं. सामाजिक समानता आणि पर्यावरणाची काळजी हे इथल्या जीवनशैलीचे महत्त्वाचे भाग आहेत.
अमेरिका आणि चीन का नाहीत यादीत?
* अमेरिका हा जगातील सर्वात प्रभावशाली देश मानला जातो, पण HDI सारख्या निर्देशांकामध्ये तो मागे आहे. कारण, महागडी आरोग्यसेवा, वाढती सामाजिक विषमता, बंदुक हिंसाचार, आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा प्रत्येकासाठी सहज उपलब्ध नसणं.
* चीनने आर्थिक विकासात खूप मोठी झेप घेतली आहे. पण अजूनही व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांमध्ये तो पिछाडीवर आहे. नागरिकांवर असणाऱ्या निर्बंधांमुळे आणि माहितीवरच्या नियंत्रणामुळे चीनला HDI यादीत वरचं स्थान मिळालं नाही.
