ट्रेनमध्ये कोणते पाळीव प्राणी नेता येतात? भारतीय रेल्वेचे ‘हे’ नियम एकदा नक्की वाचा!
पाळीव प्राण्यांसोबत रेल्वेने प्रवास करण्याची प्लॅन करताय? मग हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे! भारतीय रेल्वे काही प्राण्यांना प्रवासाची परवानगी देते, पण त्यासाठी काही नियम, अटी आणि प्रक्रिया पाळावी लागते.

भारतीय रेल्वे प्रवाशांना पाळीव प्राण्यांसह प्रवासाची परवानगी देते. पण यासाठी काही नियम पाळावे लागतात. कुत्रा, मांजर, ससा किंवा पोपट अशा पाळीव प्राण्यांना तुम्ही ट्रेनमधून नेऊ शकता. मात्र, यासाठी योग्य माहिती आणि तयारी आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास अडचणी येऊ शकतात. अनेकदा प्रवासी माहितीअभावी प्राण्यांना ट्रेनमध्ये घेऊन येतात आणि नंतर त्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच, हे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला, कोणते प्राणी ट्रेनमधून नेता येतात आणि त्यासाठी काय करावे लागते, हे पाहू.
कोणत्या प्राण्यांना नेता येईल?
सामान्यपणे प्रवासी कुत्रे आणि मांजरे यांसारख्या पाळीव प्राण्यांना सोबत नेतात. याशिवाय ससा, पोपट यांसारखे छोटे प्राणीही ट्रेनमधून नेणे शक्य आहे. पण यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करणे गरजेचे आहे. मोठ्या प्राण्यांसाठी, जसे की घोडे किंवा गाय, मालवाहू गाड्यांमधून विशेष व्यवस्था केली जाते. मात्र, अशा प्राण्यांच्या नुकसानीची जबाबदारी रेल्वेकडे नसते, हे लक्षात ठेवा.
प्रवासासाठी कोणत्या कोचची निवड करावी?
पाळीव प्राण्यांना फक्त फर्स्ट एसी किंवा फर्स्ट क्लास कोचमध्येच सोबत ठेवता येते. यासाठी संपूर्ण कूपे (दोन बर्थ) किंवा केबिन (चार बर्थ) बुक करावे लागते. फर्स्ट एसीमध्ये प्रवास करताना प्राण्याला सुरक्षित पिंजऱ्यात ठेवणे बंधनकारक आहे. त्याच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तुमचीच असते. छोट्या पिल्लांना किंवा मांजरीच्या पिलांना बास्केटमध्ये ठेवून कोणत्याही कोचमध्ये नेणे शक्य आहे, पण त्यासाठीही बुकिंग आवश्यक आहे.
एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर क्लास, सेकंड क्लास किंवा एसी चेअर कारमध्ये पाळीव प्राण्यांना परवानगी नाही. जर तुम्ही फर्स्ट एसीऐवजी गार्ड व्हॅन (लगेज व्हॅन) निवडले, तर प्राण्याला तिथे ठेवले जाते. यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. गार्ड व्हॅनमधील परिस्थिती फारशी चांगली नसते, त्यामुळे तुमच्या प्राण्याला तिथे त्रास होऊ शकतो. म्हणून फर्स्ट एसी कूपे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
बुकिंग आणि शुल्क कसे ठरते?
पाळीव प्राण्याला ट्रेनमधून नेण्यासाठी बुकिंग करावी लागते. ट्रेन सुटण्याच्या किमान तीन तास आधी रेल्वे स्टेशनवरील सामान कार्यालयात (पार्सल ऑफिस) जावे लागते. तिथे प्राण्याचे वजन तपासले जाते. गार्ड व्हॅनमधील बुकिंगसाठी 30 किलो वजनापर्यंत शुल्क आकारले जाते. फर्स्ट एसीमध्ये 60 किलो वजनाच्या सामानाएवढे शुल्क लागते, मग प्राण्याचे वजन कितीही असो. बुकिंग न करता प्राण्याला घेऊन गेल्यास आणि ते आढळल्यास सहापट दंड आकारला जातो. हा दंड किमान 30 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळे बुकिंग करणे टाळू नये. ऑनलाइन बुकिंग सुविधाही उपलब्ध आहे. IRCTC वेबसाइटवर “पेट” हा पर्याय निवडून तुम्ही प्राण्याचे तिकीट बुक करू शकता. पण प्रत्यक्ष बुकिंगसाठी पार्सल ऑफिसला भेट द्यावी लागते.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पाळीव प्राण्याला ट्रेनमधून नेण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात:
1. प्रवासाच्या 24 ते 48 तास आधी पशुवैद्याकडून घ्यावे लागते. यात प्राण्याची जात, रंग आणि लिंग नमूद असावे. प्राण्याला कोणताही संसर्गजन्य आजार नसल्याचे प्रमाणपत्रात स्पष्ट असावे.
2. प्राण्याला रेबीज, पार्वो, डिस्टेंपर यांसारख्या आजारांविरुद्ध लस दिलेली असावी. याचा पुरावा म्हणून लसीकरण कार्ड सोबत ठेवावे.
3. आधार कार्ड किंवा अन्य सरकारी ओळखपत्र असावे.
4. तुमचे तिकीट कन्फर्म असावे. वेटलिस्टेड तिकीटावर प्राण्याला नेण्याची परवानगी नाही.
ही कागदपत्रे नसल्यास बुकिंग होत नाही. त्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा.
