स्वादिष्ट अन्न पाहिल्यावर तोंडाला पाणी का सुटतं? वाचा सविस्तर
स्वादिष्ट अन्न पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणं हे नैसर्गिक आहे, पण प्रत्येक वेळी त्या मोहाला बळी पडणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं! फास्ट फूडची लज्जत तात्पुरती असते, पण दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्यासाठी योग्य निवड करावी लागते.

स्वादिष्ट अन्न पाहिलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं, नाही का? पाणीपुरी, समोसे, बर्गर किंवा गरमागरम भजी पाहिलं की आपलं मनही आनंदाने नाचायला लागतं. पण हे असं का होतं, यामागचं कारण आपल्या शरीरात आणि मेंदूत लपलेलं आहे.
आपण जेव्हा चमचमीत किंवा गोड पदार्थ पाहतो, तेव्हा मेंदूमधील ‘रिवॉर्ड सेंटर’ लगेच सक्रिय होतं. हे केंद्र डोपामाइन, सेरोटोनिन यांसारखे आनंद देणारे हॉर्मोन्स निर्माण करतं. यामुळे आपल्याला त्या अन्नाकडे ओढ वाटते आणि लगेच लाळ सुटते. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आपल्यात हजारो वर्षांपासून विकसित झालेली आहे.
पण लक्षात घ्या, हा आनंद थोड्याच वेळासाठी टिकतो. लवकरच हॉर्मोन्स कमी होतात आणि पुन्हा भूक लागते. त्यामुळे जर आपण सतत फास्ट फूड किंवा गोड पदार्थ खात राहिलो, तर खाण्याच्या सवयी बिघडू शकतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
फास्ट फूडमध्ये माइक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषकतत्त्वं कमी असतात. असे अन्न शरीराला ऊर्जा देण्याऐवजी थकवा आणि तणाव वाढवू शकतं. याउलट फळं, भाज्या, ओट्स यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर आणि पाणी भरपूर असतं, जे शरीराला हळूहळू आणि टिकून राहणारी ऊर्जा देतात.
आपल्या खाण्याच्या निवडीवर ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ देखील परिणाम करतो. जीआय जास्त असलेले पदार्थ रक्तातील साखर पटकन वाढवतात आणि पुन्हा कमी करतात, ज्यामुळे पुन्हा भूक लागते. जीआय कमी असलेले पदार्थ रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.
तर चविष्ट अन्न पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणं अगदी नैसर्गिक आहे. पण प्रत्येक वेळी या मोहाला बळी न पडता, आपल्या खाण्याच्या सवयींवर योग्य नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. रोजच्या आहारात पोषणमूल्य असलेले आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करून निरोगी आरोग्याकडे वाटचाल करायला हवी.
