भारताच्या पूर्वेला असूनही ‘West Bengal’ नाव कसं पडलं? जाणून घ्या सविस्तर

भारताच्या नकाशात पूर्वेकडील टोकाला असणाऱ्या पश्चिम बंगाल या राज्याच्या नावात पश्चिम हा शब्द का लावण्यात आला? अनेकांना माहिती नाही उत्तर. जाणून घ्या सविस्तर

भारताच्या पूर्वेला असूनही ‘West Bengal’ नाव कसं पडलं? जाणून घ्या सविस्तर
| Updated on: May 06, 2026 | 2:58 PM

भारताच्या नकाशात पूर्वेकडील टोकाला असलेल्या पश्चिम बंगाल या राज्याच्या नावात ‘पश्चिम’ हा शब्द का आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. भौगोलिकदृष्ट्या पूर्वेकडे असलेल्या राज्याला ‘पश्चिम’ असे नाव का देण्यात आले. यामागे एक रंजक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी दडलेली आहे.

एकेकाळी ‘बंगाल’ हा प्रदेश अतिशय विशाल, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न मानला जात होता. गंगा-ब्रह्मपुत्र डेल्टामध्ये पसरलेला हा भाग साहित्य, कला आणि व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होता. ब्रिटिश काळात ‘बंगाल प्रेसिडेन्सी’ हा मोठा प्रशासकीय विभाग होता, ज्यामध्ये आजचा पश्चिम बंगाल, बांग्लादेश, तसेच बिहार आणि ओडिशाच्या काही भागांचा समावेश होता. त्या काळात या संपूर्ण प्रदेशाला ‘बंगाल’ म्हणूनच ओळखले जात होते.

यानंतर 1905 साली ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी प्रशासनिक सोयीच्या नावाखाली बंगालचे दोन भाग केले. मात्र, यामागचा खरा हेतू वाढत चाललेल्या राष्ट्रवादी चळवळीला कमकुवत करणे हा होता. या विभाजनामुळे ‘पूर्व बंगाल’ आणि ‘पश्चिम बंगाल’ अशी संकल्पना प्रथमच पुढे आली. भारतीयांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला आणि स्वदेशी आंदोलन उभारले. अखेर 1911 मध्ये ब्रिटिश सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. तरीसुद्धा, बंगालचे दोन भाग असू शकतात ही कल्पना समाजात पक्की झाली.

कसे पडले पश्चिम बंगाल नाव?

खरा निर्णायक टप्पा 1947 मध्ये आला, जेव्हा भारताचे विभाजन झाले. धार्मिक आधारावर देशाचे विभाजन करण्यात आले आणि बंगालचेही दोन भाग पडले. पश्चिमेकडील भाग, जिथे हिंदू लोकसंख्या अधिक होती, तो भारतात राहिला आणि त्याला ‘पश्चिम बंगाल’ असे नाव देण्यात आले. तर पूर्वेकडील भाग ‘पूर्व पाकिस्तान’ बनला, जो पुढे 1971 मध्ये स्वतंत्र होऊन बांग्लादेश म्हणून उदयास आला.

याच काळापासून ‘पश्चिम बंगाल’ हे नाव अधिकृतरीत्या प्रचलित झाले. येथे ‘पश्चिम’ हा शब्द भौगोलिक दिशेला दर्शवत नाही तर तो ऐतिहासिकदृष्ट्या जुन्या बंगालच्या पश्चिमेकडील भागाचे प्रतिनिधित्व करतो.

आजही वेळोवेळी या राज्याचे नाव बदलून ‘बंगाल’ किंवा ‘बांग्ला’ करण्याची चर्चा होते, जेणेकरून दिशेशी संबंधित संभ्रम दूर होईल. मात्र, अद्याप हे ऐतिहासिक नाव कायम ठेवण्यात आले आहे. ‘पश्चिम बंगाल’ हे नाव केवळ एक भौगोलिक ओळख नसून, भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींची आठवण करून देणारे आहे.

Follow Us