
पावसाळ्याचा हंगाम केवळ गारवा आणि निसर्गसौंदर्य घेऊन येत नाही, तर तो घर खरेदीसाठीही एक अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य काळ मानला जातो. जर तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेला पावसाचा काळ तुमच्यासाठी योग्य संधी घेऊन आला आहे. घराची मजबुती, परिसरातील पायाभूत सुविधा आणि होम लोनवरील व्याजदर अशा अनेक गोष्टींचा खरी चाचणी याच काळात होते. त्यामुळे घर खरेदी करण्याआधी पावसाळा अनेक पैलूंना समजून घेण्याचा योग्य काळ आहे. चला तर मग, जाणून घेऊया अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या सांगतात की पावसाळा घर खरेदीसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतो.
कोणतेही घर घेताना त्याचे आकर्षक लूकपेक्षा अधिक महत्त्व त्याच्या टिकाऊपणाला दिले पाहिजे. पावसाच्या काळात छतांवरून गळती होते का, भिंतींवर ओलावा आहे का, बाथरूममध्ये पाणी साचते का, दरवाजे आणि खिडक्या नीट बंद होतात का याची तपासणी शक्य होते. काही ठिकाणी पावसामुळे पाणी साचते का हे देखील याच काळात स्पष्ट दिसते. त्यामुळे घर खरेदीपूर्वी अशी निरीक्षणं केल्यास भविष्यातील त्रास वाचवता येतो.
घर घेताना केवळ घरच नव्हे तर त्या परिसरातील पायाभूत सुविधा, म्हणजेच रस्ते, नाली व्यवस्था, पाणी व वीज पुरवठा यांचाही विचार केला पाहिजे. पावसात अनेक रस्त्यांवर पाणी साचते, ट्रॅफिकची समस्या वाढते, वीज वारंवार जाते. काही वेळा बिल्डर आकर्षक वायदे करतात की घर मुख्य रस्त्याशी जोडलेले आहे, पण प्रत्यक्षात कच्चे रस्ते किंवा खराब ड्रेनेज यामुळे खूप त्रास होतो. ही सर्व स्थिती फक्त पावसातच दिसते.
RBI ने रेपो रेटमध्ये घट केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. युनियन बँक 7.35% दराने तर SBI 7.50% दराने होम लोन देत आहे. पंजाब नॅशनल बँकेनेही आपले दर 8% वरून 7.45% पर्यंत कमी केले आहेत. अशा वेळी घर खरेदीसाठी ही संधी चुकवू नये.
पावसाळ्यात काही ठिकाणी सतत वीज जात असते, आणि अनेक भागांत काही तासांपर्यंत लाईट येत नाही. त्यामुळे घर खरेदी करताना त्या भागात वीजपुरवठा कसा आहे, बिल्डिंगमध्ये जनरेटरची सोय आहे का, पार्किंग व कॉमन एरिया साठी बॅकअप आहे का याची तपासणी करावी. विशेषतः जेव्हा तुम्ही शहराच्या बाहेरच्या किंवा शांत परिसरात घर घेत असता, तेव्हा ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)