पुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या, अजित पवारांचे आदेश

| Updated on: Apr 25, 2020 | 8:18 PM

प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत (Ajit Pawar on Corona Prevention in Pune).

पुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या, अजित पवारांचे आदेश
Follow us on

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत (Ajit Pawar on Corona Prevention in Pune). त्यांनी आज (25 एप्रिल) पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील स्थितीची माहिती घेण्यात आली.

कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत कोविड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, “क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांची अथवा खासगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्टनुसार जिल्हाधिकारी यांना संबंधित इमारती अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या 2 महिन्यात 8 वा, 9 वा आणि 10 वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे.”

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी शारीरिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल. ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल, अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

नागरिकांच्या राहण्याच्या अडचणीबाबत पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत उपलब्ध केलेल्या जागेत राहण्यासाठी जाता येईल, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर

Pune Corona Update | पुण्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत 195 कोरोना रुग्ण, कोणत्या वॉर्डात किती?

पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू

Ajit Pawar direct to use private hospital hotels and Schools in Pune