तीन तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच, अण्णा उपोषणावर ठाम

तीन तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच, अण्णा उपोषणावर ठाम

अहमदनगर : उपोषणाच्या सहाव्या दिवशी तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं समाधान करण्यात सरकारला यश येईल असं वाटत होतं. पण तीन तासांची मॅरेथॉन बैठक निष्फळ ठरली. कारण ठोस आणि लेखी आश्वासन न मिळाल्याने अण्णांनी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अण्णा उपोषण मागे घेतील, अशा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय.

अण्णांचं गाव राळेगणसिद्धीमध्ये तब्बल तीन तास मंत्री गिरीष महाजनांसोबत बैठक झाली. अडीच तासांनंतर केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरेही आले. पण बैठक निष्फळ ठरली. केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर अण्णाचं समाधान झालं नाही. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या मागणीसंदर्भात कुठेही मागे-पुढे हटवण्याची तयारी अण्णांची नाही.

उपोषणाला सहा दिवस झाले आहेत. तासागणिक तब्येत बिघडत चालली आहे. पण याआधीचा अण्णांचा सरकारसोबतचा अनुभव वाईट राहिलाय आणि त्यामुळेच अण्णा आता फार विश्वास ठेवण्याच्या मूडमध्ये नाहीत. मी भारतीय सैन्यातला जवान आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलंय.

मुख्यमंत्र्यांवर अण्णा संतापले

आजवर अण्णा हजारे सरकारवर टीका करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते थोडे नरमच होते. पण आज अण्णा हजारेंचा मुख्यमंत्र्यांवरचा संताप चांगलाच समोर आला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राळेगणसिद्धीत जाऊन मोदींचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या 90 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला आणि अण्णा चांगलेच संतापले मुख्यमंत्री आता मनातूनच उतरल्याचा घणाघात अण्णांनी केला.

दुसरीकडे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी दुसऱ्या ठाकरे बंधूंनी पाठींबा दिला. राळेगणसिद्धीत जाऊन राज ठाकरेंनी अण्णांची विचारपूस केली. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रक काढून मोदींवर हल्लाबोल करत अण्णांना उपोषण सोडवण्याची मागणी केली.

लोकपाल आणि लोकायुक्ताच्या लढाईवर अण्णा ठाम आहेत. भाजप सरकारने आजवर मोठ्या कुशलतेने अण्णांचं आंदोलन संपवलंय. पण आता भाजपची खेळी अण्णांनाही चांगलीच माहित झाली आहे. त्यामुळे यापुढची अडचणही सरकारचीच असेल.

Published On - 9:25 pm, Mon, 4 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI