कष्टाचे स्टार परतले, 154 पीएसआयना नियुक्ती पत्र!

कष्टाचे स्टार परतले, 154 पीएसआयना नियुक्ती पत्र!

मुंबई: तब्बल 9 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण घेऊन, मानाने मिळवलेले स्टार खांद्यावर लावू न शकलेल्या 154 पीएसआयना अखेर पद आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने या सर्व पीएसआयना नियुक्तीपत्र दिलं आहे. आता हे पीएसआय लवकरच नियुक्तीस्थळी रुजू होतील.

शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने अनुसूचित जाती जमातीतील 154 पीएसआयना मूळ पदावर पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र मॅट कोर्टात या पीएसआयनी पुन्हा दाद मागितल्यानंतर, अनेक सुनावण्या झाल्या, त्यामध्ये 154 जणांची नियुक्ती ही सरळसेवेतूनच झाल्याचं सिद्ध झालं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही परीक्षा सरळसेवेतूनच झाल्याचं स्पष्ट केल्याने, अखेर हे पीएसआय मानाने पदावर रुजू होतील.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखून त्यांना मूळ पदावर पाठवलं होतं. त्यामुळे नऊ महिन्यांचं प्रशिक्षण घेऊन आणि मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शपथविधी होऊनही या पीएसआयना मूळ पदावर जावं लागलं. मात्र मॅटने पुन्हा सुनावणी केल्यानंतर या पीएसआयना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही या पीएसआयच्या नियुक्तीला अडथळे येत होते.

प्रशिक्षण घेतलेल्या 154 पीएसआयना एका दिवसात मूळ पदावर पाठवण्याबाबत जी तत्परात दाखवली, तीच तत्परता त्यांना पुन्हा नियुक्त करण्यात का दाखवत नाहीत, हा प्रश्न होता. दुसरीकडे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) यांनीही या सर्व पोलिसांना सेवेत सामावून घेऊ, असा पत्रव्यवहार गृहविभागाला केला.  मात्र तरीही हे 154 जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी या पीएसआयची नियुक्ती सरळसेवा परीक्षेतून झाल्याचं सांगितलं होतं.  या सर्व पीएसआयने प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, त्यामुळे त्यांना सेवेत घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

अखेर या पीएसआयना नियुक्ती पत्र मिळालं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI