आंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग, उशीने तोंड दाबून मुलीची हत्या

| Updated on: Feb 22, 2020 | 3:17 PM

भुसावळमध्ये ऑनर किंलिंगची धक्कादायक घटना पुढे आली आहे (Bhusawal Honor Killing ). आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली.

आंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग, उशीने तोंड दाबून मुलीची हत्या
Follow us on

जळगाव : भुसावळमध्ये ऑनर किंलिंगची (Bhusawal Honor Killing) धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपी आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

तळवेल येथील सुधाकर मधुकर पाटील (वय-46) आणि नंदाबाई सुधाकर पाटील (वय- 40) यांना त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली (Bhusawal Honor Killing). आपल्या मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध आहेत या रागातून या निर्दयी आई-वडिलांनी झोपेतच मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली.

नेमकं प्रकरण काय?

आंतरजातीय तरुण आपल्या मुलीच्या मागे लागल्याने मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न एका दुसऱ्या मुलाशी ठरवलं. मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील मुलासोबत येणाऱ्या 26 फेब्रुवारीला हा विवाह पार पडणार होता. मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याने समाजात आपली बदनामी होईल या रागातून या निर्दयी आई-वडिलांनी मुलगी झोपलेली असताना उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी मुलगी उठत नाही, झोपेतच तिचा मृत्यू झाला, असं आई-वडिलांनी सांगितलं. मात्र, याविषयी गावामध्ये कुजबूज होऊ लागली. त्यामुळे तळवेल येथील पोलीस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शरीरावर काही संशयास्पद खुणा आढळल्या. त्यावरुन या मुलीचा मृतदेह जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

शवविच्छेदनातून उघडले रहस्य

शवविच्छेदन अहवालात अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आई-वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. या निर्दयी आई-वडिलांनी बुधवारी (19 फेब्रुवारी) रात्री मुलगी झोपलेली असताना, झोपेतच उशीने तिचं नाक, तोंड दाबलं, तसेच गळा आवळून तिची हत्या केली.

याप्रकरणी मुलीचे वडील सुधाकर पाटील आणि आई नंदाबाई पाटील यांच्याविरोधात कलम 302, 34 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Bhusawal Honor Killing). न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.