किशोरी शहाणे जळत होती, सुरेखा पुणेकरांचं टीकास्त्र, आता विधानसभेची तयारी सुरु

कलर्स मराठीवरील बिग बॉस सीझन दोनमधून बाहेर पडलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

किशोरी शहाणे जळत होती, सुरेखा पुणेकरांचं टीकास्त्र, आता विधानसभेची तयारी सुरु

पुणे :  कलर्स मराठीवरील बिग बॉस सीझन दोनमधून बाहेर पडलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “किशोरी शहाणे ही माझ्यावरती जळत होती.  इतर कलाकार मला इज्जत देत असताना ती जळायची. किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल. ती पण लवकर बिग बॉसमधून बाहेर पडेल”, असं रोखठोक वक्तव्य सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केलं. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

बिग बॉसच्या घरातून निवडणुकीच्या आखाड्यात

दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी आता विधानसभा निवडणुका लढवण्याचं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या नावाची चर्चा होती. पण आता सुरेखा पुणेकर यांना विधानसभेचे वेध लागल्याचं दिसून येत आहे. पुणे, मोहोळ आणि नांदेड यापैकी एका मतदारसंघातून निवडणुका लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत.

“उमेदवारीसाठी मला अनेक पक्षांकडून प्रस्ताव आला आहे, मात्र पक्ष अजून ठरला नाही. मी प्रत्येक निवडणुकीच्या तयारीत आहे”, असं त्यांनी सांगितलं.

सहा आठवड्यांनी बाहेर

दरम्यान, सुरेखा पुणेकर या तब्बल 6 आठवड्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. मी सहा आठवडे बिग बॉसच्या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे असं त्यांनी घरातून बाहेर आल्यानंतर सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI