
वसई : राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आज भारतीय जनता पक्षाचे वसई-विरार जिल्हा युवा अध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलीस ठाण्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दीक टीका झाल्याचंही पहायला मिळालं आणि आता भाजपने ही मागणी केली आहे.
राष्ट्रगीत पूर्ण न होताच निघाल्याचा आरोप
ममता बॅनर्जी या एका कार्यक्रमा दरम्यान कार्यक्रम संपताना देशाच्या राष्ट्रगीताच्या चार-पाच ओळी उच्चारुन राष्ट्रगीत पूर्ण न करताच तेथून निघून गेल्या. त्यांची ही कृती देशाच्या राष्ट्रगीताच्या प्रती असंवेदनशीलता आणि अपमान करणारी असून, ममता बॅनर्जी यांच्यावर प्रिविशनल ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर 1971 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरवदे यांना दिलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल होणार?
भाजपच्या या तक्रारीनंतर पोलिसांकडून अद्याप कोणतीही कायदेशीर बाजू मांडण्यात आली नाही, किंवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांची याबाबत भूमिका काय आहे? हे अद्याप अस्पष्ट आहे. पण आधीच वादळी ठरलेला ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा आणखी वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या या तक्रारीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.