2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार, अकाली दल NDAतून बाहेर पडल्यानंतर भाजपची मोठी घोषणा

| Updated on: Nov 17, 2020 | 12:18 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर भाजपने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील विधानसभेच्या सर्व 117 जागा भाजप स्वबळावर लढणार आहे. 2022 ची विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरु केल्याचंही तरुण चुग यांनी सांगितलं.

2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार, अकाली दल NDAतून बाहेर पडल्यानंतर भाजपची मोठी घोषणा
Follow us on

नवी दिल्ली: पंजाबमध्ये आतापर्यंत अकाली दलासोबत निवडणूक लढवणारी भाजप आता स्वबळावर दंड थोपटणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करताना अकाली दलानं केंद्र सरकार आणि NDAतूनही एक्झिट घेतली. त्यानंतर अखेर भाजपचे महासचिव तरुण चुग यांनी भाजप आता 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा सोमवारी केली.(BJP will contest Punjab Assembly elections on its own)

बिहार विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर भाजपने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील विधानसभेच्या सर्व 117 जागा भाजप स्वबळावर लढणार आहे. 2022 ची विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरु केल्याचंही तरुण चुग यांनी सांगितलं. त्यासाठी स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यातील 23 हजार मतदान केंद्रांवर भेटीगाठी सुरु केल्या आहेत. 19 नोव्हेंबरला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे 10 जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर ते 3 दिवसाच्या पंजाब दौऱ्यावरही जाणार असल्याची माहिती चुग यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 160 लोक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजप कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी NDAतील सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दल बाहेर पडल्यानंतर सोमवारी भाजपच्या महासचिवांनी पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

भाजपला आतापर्यंत पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागांपैकी 3 तर विधानसभेचत्या 117 जागांपैकी 23 जागा मिळत होत्या. अन्य जागांवर अकाली दलाचे उमेदवार निवडणूक लढवत होते. पंजाबमध्ये भाजपनं 1992 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती, अशी माहिती चुग यांनी दिली.

अकाली दल, काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात- चुग

अकाली दलाचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. येणाऱ्या काळात अजून काही नेते पक्ष सोडतील. तर काँग्रेस आणि अकाली दलाचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा चुग यांनी केला आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याला अकाली दलाचा विरोध

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (Agriculture Bills) विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने (Akali Dal) NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं. NDAतून बाहेर पडण्यापूर्वीच अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अकाली दलाने थेट आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 26 सप्टेंबर रोजी शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमेटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द

शेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

BJP will contest Punjab Assembly elections on its own