शिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत ‘भरपाई’ची संधी

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 पैकी आठ, तर उत्तराखंडमधील एकमेव जागाही भाजपच्या खिशात जाण्याची दाट शक्यता आहे

शिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुका भारतीय जनता पक्षाचे सभागृहातील संख्याबळ वाढवण्यास मदत करणार आहेत. शिवसेना आणि अकाली दल या दोन महत्त्वाच्या मित्रपक्षांनी ‘एनडीए’तून बाहेरचा रस्ता धरल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची भाजपकडे संधी चालून आली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या नजीकच्या काळात प्रथमच 100 च्या खाली जाईल. पर्यायाने मोदी सरकारला वरिष्ठ सभागृहात बळकटी येण्यास फायदा होईल. (BJP fields 8 candidates for Uttar Pradesh Rajyasabha Election)

2020 मधील अखेरच्या द्वैवार्षिक निवडणुका नऊ नोव्हेंबरला होत आहेत. अकरा विद्यमान राज्यसभा सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. या 11 जागांपैकी सत्ताधारी भाजपकडे सध्या केवळ उत्तर प्रदेशमधील तीन जागा आहेत. बाकीच्या आठ जागांवर समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसप) यांचे खासदार आहेत.

अकरापैकी नऊ जागा जिंकण्याची चिन्हं

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 पैकी आठ जागा भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील एकमेव जागाही भाजपच्या खिशात जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच भाजपाला अधिकच्या सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे, यूपीमधील पाच आणि उत्तराखंडमधील एक. त्यामुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ सध्याच्या 86 वरुन 92 पर्यंत वाढेल.

शिवसेना आणि अकाली दल हे मित्रपक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडल्यामुळे भाजपला झळ बसली होती. दोन्ही पक्षांच्या राज्यसभेत प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा जागा होत्या. परंतु आगामी निवडणुकांमध्ये भाजप या सहा जागा भरुन काढणार, असे दिसते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने एनडीएला रामराम ठोकला आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तर विश्वासू शिरोमणी अकाली दलानेही कृषी कायद्यांच्या विरोधात एनडीएची साथ सोडली.

तर भाजप 118 वर पोहोचेल

245 सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 123 जागांची आवश्यकता असते. एनडीएला अद्याप बहुमत गाठणे शक्य नसले, तरी नव्या सहा जागांच्या साथीने एनडीए 112 वरुन पुन्हा 118 वर पोहोचेल. म्हणजेच केवळ पाच जागा दूर (शिवसेना-अकाली दल एनडीएमध्ये असते, तर या निवडणुकांमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा 124 जागांसह पार केला असता)

दुसरीकडे, विरोधीपक्षांच्या जागा 101 वरुन घसरुन 95 वर जातील. शिवसेना आणि अकाली दल यांनी अद्याप विरोधी पक्षांशी म्हणजे यूपीएशी हातमिळवणी केली नसल्याने त्यांना आपली ताकद शंभरीच्या वर राखता येणार नाही.

राज्यसभेचे गणित कसे?

लोकसभा खासदारांची निवड थेट मतदारांमधून होते, राज्यसभेचे गणित मात्र काहीसे क्लिष्ट असते. विधानसभेत ज्या पक्षाचे जास्त आमदार तितकेच, राज्यसभेत अधिक खासदार

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. राज्यसभेच्या सदस्यांची संख्या आहे 31
नियमानुसार 31 अधिक एक = 32
32 भागिले उत्तर प्रदेशातील एकूण विधानसभा आमदार (403)
(32 भागिले 403) = 12. 59
नियमानुसार 12. 59 अधिक एक = 13.59, राउंड फिगर – 13
म्हणजेच राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी 13 आमदार मतदान करणार

जागा वाढल्यास राज्यसभेत भाजपचा आवाज मित्रपक्षांच्या मदतीशिवाय मजबूत होईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपने स्वबळावर बहुमत काबीज केलं, त्यामुळे केंद्रीय कॅबिनेटमध्ये एकही भाजपेतर मंत्री नाही. त्याचप्रमाणे आता राज्यसभेतही स्वतःचा डंका वाजवण्यास भाजप उत्सुक आहे.

संबंधित बातम्या :

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ

राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ

(BJP fields 8 candidates for Uttar Pradesh Rajyasabha Election)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI