चंद्रपूर कोरोना नियंत्रण कक्षातच नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस

| Updated on: Jun 08, 2020 | 5:42 PM

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस येथे धडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियंत्रण कक्षातच केक कापण्यात आला.

चंद्रपूर कोरोना नियंत्रण कक्षातच नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपुरात आरोग्य अधिकाऱ्यांनीच कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याचं (Chandrapur Corona Rules Violation) समोर आलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस येथे धडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियंत्रण कक्षातच केक कापण्यात आला. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आलं, यावेळी तोंडाला मास्कही लावण्यात आलेले नव्हते. नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच नियमांची पायमल्ली केली. वायरल झालेल्या फोटोमुळे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची नाचक्की (Chandrapur Corona Rules Violation) झाली आहे.

चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सध्याच्या काळातील संवेदनशील कोरोना नियंत्रण कक्षात हा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाभरातून कोरोना नियंत्रण आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी याच कोरोना नियंत्रण कक्षातून आदेश जारी होत असतात. याच नियंत्रण कक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला.

कोरोना काळात शारीरिक अंतर पाळा, तोंडाला मास्क लावा, आवश्यक तेवढेच सण उत्सव कार्यक्रम साजरे करा, अशा पद्धतीच्या रोजचा सूचनांचा रतीब याच कार्यालयातून जारी होतो. मात्र, या सर्व सूचना केवळ नागरिकांसाठीच आहेत, अधिकाऱ्यांसाठी नाही, असा समज झालेल्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क नियंत्रण कक्षातच डॉ. गहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. केक कापून, केक भरवून आणि आनंदात साजरा करत गहलोत यांच्या लग्नाच्या वाढदिवसात तमाम आरोग्य अधिकारी (Chandrapur Corona Rules Violation) सहभागी झाले.

या कार्यक्रमाचे सर्व फोटो सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कक्षाच्या 100 पावले अंतरावर असलेल्या या नियंत्रण कक्षातच अधिकाऱ्यांच्या सूचनांची पायमल्ली झालेली दिसली. अगदी गाव पातळीपर्यंत नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठीची यंत्रणा इथूनच कार्यान्वित होते. मात्र, डॉ. गहलोत आणि त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांनी आमचे कोण काय बिघडवते? असा समज करुन घेतल्याचे दिसले. नियंत्रण कक्षात साजरा केलेल्या वाढदिवसाने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची मात्र नाचक्की झाली आहे.

या व्हायरल फोटोबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गेहलोत यांनी लग्नाचा वाढदिवस नियंत्रण कक्षात साजरा झाला याला दुजोरा दिला. कुटुंब दूर आहे, आम्ही सतत तणावात आहोत, विरंगुळा म्हणून सेलिब्रेशन केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सेलिब्रेशनआधी सर्वांना सॅनिटाईज केले गेले, अशी खबरदारीयुक्त पुस्तीही त्यांनी जोडली.

Chandrapur Corona Rules Violation

संबंधित बातम्या :

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर

नागपूरकरांना दिलासा, 13 वस्त्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित नाही, प्रतिबंध क्षेत्रातून वगळले