फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

| Updated on: Nov 03, 2020 | 7:48 PM

चारकोप परिसरात एका चिमुकल्या मुलीचं अपहरण करुन 30 हजार रुपयांमध्ये या मुलीची विक्री करण्यात आली.

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक
Follow us on

मुंबई : मुंबईच्या चारकोप परिसरात एका चिमुकल्या मुलीचं अपहरण करुन 15 हजार रुपयांमध्ये (Charkop Child Trafficking) या मुलीची विक्री करण्यात आली. या प्रकरणी विक्री करणाऱ्या पती-पत्नीसह खरेदी करणाऱ्या दम्पत्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या चार तासात या घटनेचा छडा लावला (Charkop Child Trafficking).

झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीची आई सुनिता गुरवने या चारकोप परिसरातील फुटपाथवर कुटुंबासोबत झोपलेल्या होत्या. पहाटे जेव्हा त्या उठल्या तेव्हा त्यांची 1 वर्षीय मुलगी त्यांना कुठेही दिसली नाही. त्यानंतर त्यांनी सगळीकडे शोधलं मात्र त्यांना मुलगी कुठेही सापडली नाही. त्यानंतर त्यांनी आज सकाळी 11 वाजता चारकोप पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

चारकोप पोलिसांनी या चिमुकलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करुन संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

काही वेळाने पोलिसांना त्या मुलीचं अपहरण करणाऱ्या पती-पत्नीची माहिती मिळाली. पोलिसांनी या पती-पत्नीचा पाठलाग करुन जोगेश्वरी परिसरातून विक्री करणाऱ्या पती-पत्नीसह खरेदी करणाऱ्या दम्पत्तीला अटक केली आहे.

लग्नाला अनेक वर्ष होऊनही मुल झालं नाही, त्यामुळे ते बाळाच्या शोधात होते. त्यानंतर या दम्पत्तीने आरोपी पती-पत्नीशी संपर्क साधला आणि त्या चिमुकलीची चोरी करणाऱ्यांनी 30 हजार रुपयांमध्ये तिला विकण्याचं ठरवलं. मात्र, वाटाघाटी करुन अवघ्या 15 हजारांमध्ये या चिमुकलीला विकलं.

चिमुकलीला खरेदी करणाऱ्यांचं नाव सचिन येलवे आणि सुप्रिया येलवे असं आहे. तर, विक्री करणाऱ्या पती-पत्नीचं नाव राजू पवार आणि रश्मी नायक असं आहे. बाळाची चोरी करणारी आणि विकत घेणारी महिला ही एकत्र पार्लरमध्ये काम करतात.

सध्या चारकोप पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच, या आरोपींविरुद्ध आणखी किती अपहरण आणि मुलं विकण्याची प्रकरणं आहेत याचाही पोलीस तपास करत आहेत.

Charkop Child Trafficking

संबंधित बातम्या :

ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी

मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक