ओला दुष्काळ जाहीर करा; लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Oct 22, 2020 | 7:30 PM

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान फार मोठं आहे. त्यामुळे तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

ओला दुष्काळ जाहीर करा; लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sambhajiraje chhatrapati
Follow us on

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान फार मोठं आहे. त्यामुळे तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. (chhatrapati sambhaji raje demands state govt declare wet drought in maharashtra)

खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत संभाजीराजे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. संभाजीराजे यांनी स्वत: मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीची माहिती दिली. मराठवाड्यात शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही या भागाची पाहणी केली आहे. त्यांनाही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कॅबिनेटची बैठक बोलावून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना जगवण्यासाठी कर्ज घ्यावं

ओला दुष्काळ जाहीर केल्यास राज्याला केंद्राचे आणि राज्याचे म्हणून दोन्ही फायदे मिळू शकतात. त्यामुळे ‘एनडीआरएफ’मधून आपण कर्जही घेऊ शकतो. कोरोनाच्या काळात कर्ज घ्यावं की घेऊ नये, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण शेतकरी जगावयाचा असेल तर कर्ज घेतलंच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं.

आंध्रात शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात आली आहे. हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात जेवढी मदत करता येईल तेवढी करावी, असं त्यांना सांगितलं. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे जाणं गरजेचं आहे. हा प्रस्ताव गेल्यानंतर आठ दिवसात केंद्राची टीम येईल आणि राज्याला मदत मिळेल, असं ते म्हणाले.

रात्रीपर्यंत सर्व पंचनामे द्या

आतापर्यंत 80-90 टक्के पंचनामे झाले आहेत. आज रात्रीपर्यंत सर्व पंचनामे सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी दिली.

मागच्या पुराच्यावेळचे पैसे आले की नाही शंका

पश्चिम महाराष्ट्रात मागच्यावेळी पूर आला होता. तेव्हाच्या सरकारने केंद्राकडे 2800 कोटींची मागणी केली होती. परंतु, त्यावेळी 900 कोटी रुपयेही मिळाले की नाही याची शंका आहे, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूर-सांगलीच्या पुरावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, असंही ते म्हणाले.

खडसेंना शुभेच्छा

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे हे उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांना विचारले असता, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. पण खडसेंना माझ्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले.

आरक्षणप्रश्नी सरकारवर समाधानी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत आहे. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही मराठा आरक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणतात…

खडसेंना कोणतं मंत्रिपद?; भुजबळ म्हणतात, शरद पवारच निर्णय घेतील!

काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा