जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा; चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री 

| Updated on: Nov 23, 2020 | 4:01 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली.(CM Uddhav Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)

जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा; चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री 
Follow us on

मुंबई : “महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (CM Uddhav Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)

नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही येत्या 6 डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह इत्यादी व्यक्ती उपस्थित होते.  (CM Uddhav Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)

जीव धोक्यात घालणे योग्य नाही : मुख्यमंत्री 

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्याय्याविरोधात संघर्ष करत राहीले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये.”

“चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या, त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतीदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापुर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठूरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्हच असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरीत आणि भारीत होऊन समाजाला पुढे नेऊ या. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊ या.”

कोरोनाच्या संकटात महापरिनिर्वाण दिन साधेपणाने व्हावा  : गृहमंत्री 

“महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चागंली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागांसह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येईल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

(CM Uddhav Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)

संबंधित बातम्या : 

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त