वाशिम जिल्ह्यात लाखोंचा भ्रष्टाचार, अनेक सरपंच रडारवर

वाशिम जिल्ह्यात लाखोंचा भ्रष्टाचार, अनेक सरपंच रडारवर

वाशिम : पंचायतराज समितीच्या ईतिवृत्तानुसार लेखा परिक्षण अहवालामध्ये जिल्हयातील 74 ग्रामपंचायतीत सुमारे 80 लाख रुपयांवर संशयित अपहार झाला आहे. या प्रकरणी वसूलपात्र 63 ग्रामसेवकांवर मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. या 63 ग्रामसेवकांसह एकूण 27 सरपंचांवर अपहार प्रकरणी वसुलीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित दोषी ग्रामसेवक आणि सरपंच […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

वाशिम : पंचायतराज समितीच्या ईतिवृत्तानुसार लेखा परिक्षण अहवालामध्ये जिल्हयातील 74 ग्रामपंचायतीत सुमारे 80 लाख रुपयांवर संशयित अपहार झाला आहे. या प्रकरणी वसूलपात्र 63 ग्रामसेवकांवर मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. या 63 ग्रामसेवकांसह एकूण 27 सरपंचांवर अपहार प्रकरणी वसुलीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित दोषी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून विहीत मुदतीत कारवाई न केल्याबददल सहाही तालुक्यातील पंचायत विस्तार अधिकारी यांच्या 2 वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या कारवाईमुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

पंचायत राज समितीने 17 ते 19 जानेवारी 2018 दरम्यान वाशिम जिल्हयाचा दौरा केला होता. त्याचे इतिवृत्त जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. मुंबई येथे पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसमोर 2 जानेवारी 2019 रोजी साक्ष होणार आहे. या साक्षीदरम्यान पंचायतराज समितीच्या इतिवृत्तानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने अनुपालन सादर करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पीआरसीच्या ईतिवृत्तानुसार 2001 ते 2010 या सालादरम्यान लेखा परिक्षण अहवालात जिल्हयातील 74 ग्रामपंचायतीत सुमारे 80 लाख रुपयांच्यावर संशयित अपहार झाला आहे. वसूलपात्र रकमेनुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या सचिवांवर एका आठवडयाच्या आत प्रशासकीय कारवाई करण्याचे तसेच त्यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये नोंद घेण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

या प्रशासकीय कारवाईचे स्वरुप अपहार केल्याच्या रकमेनुसार आहे. एक हजार रुपयाच्या आतील अपहारावर ठपका ठेवणे, 1 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत 1 वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद आणि 10 हजारांवरील रकमेसाठी 2 वेतन वाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे निर्देश मीना यांनी दिले. त्यानुसार पंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत निहाय आदेश काढले. या आदेशानुसार संबंधित 35 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्याकडून गटविकास अधिकारी यांनी अपहारीत रक्कम समप्रमाणात वसूल करुन तात्काळ अनुपालन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामध्ये 63 ग्रामसेवकांसह 27 सरपंचांचा समावेश आहे. जे सरपंच वसूलपात्र रक्कम भरणार नाहीत, त्यांच्या सातबारावर बोजा चढवला जाणार असून पुढील निवडणुकीत त्यांना अपात्र समजण्यात येईल. संबंधीत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून वेळेत कारवाई न केल्याबद्दल सर्व पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांची 2 वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

अपहार करणारांच्या संख्येत दुपटीने वाढीची शक्यता

पंचायतराज समितीच्या ईतिवृत्तानुसार जिल्हयातील एकूण 74 ग्रामपंचायतींमध्ये 80 लाख रुपयांच्यावर संशयीत अपहार झाला असल्याचे नमूद आहे. यापैकी 35 ग्रामपंचायतीचे 63 सचिव आणि या 35 मधील 27 सरपंचांना नावानिशी जबाबदार धरण्यात आले आहे. उर्वरीत 39 ग्रामपंचायतीमध्ये सुध्दा अपहार झाला असल्याचे पीआरसीने नमुद केले, मात्र त्यामध्ये संबंधीत सरपंच व सचिवांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. सदर ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व सचिवाच्या नावांची यादी संबंधीत गटविकास अधिकारी यांना मागवण्यात आली आहेत. ती नावे आल्यास अपहारास जबाबदार व्यक्तिंची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या इतिहासात सरपंच आणि ग्रामसेवकांवर एकाचवेळी एवढयामोठया प्रमाणात कारवाईची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. पीआरसीच्या साक्षीच्या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमान मीना यांनी केलेल्या या मोठया कारवाईमुळे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. तसेच उर्वरीत 39 ग्रामपंचातीचे तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें