‘कोरोना’सोबत राज्यासमोर ‘हे’ प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला

| Updated on: Apr 05, 2020 | 4:28 PM

आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. (Ajit Pawar on Corona Challenge)

कोरोनासोबत राज्यासमोर हे प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’वर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून ‘कोरोना’चा प्रसार रोखला, तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Ajit Pawar on Corona Challenge)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे.

हेही वाचा : पुण्यात 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू, परदेश प्रवास न केलेला चौथा पुणेकर ‘कोरोना’चा बळी

कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्तावर उतरुन गर्दी करणं टाळावं. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. (Ajit Pawar on Corona Challenge)