राम मंदिर भूमिपूजनाच्या अशुभ मुहूर्तामुळेच भाजप नेत्यांना कोरोनाची लागण, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा टोमणा

| Updated on: Aug 03, 2020 | 11:22 PM

राम मंदिराच्या पुजाऱ्याला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अशुभ मुहूर्तामुळेच कोरोनाची लागण झाल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे (Digvijaya Singh on ram mandir bhoomi pujan).

राम मंदिर भूमिपूजनाच्या अशुभ मुहूर्तामुळेच भाजप नेत्यांना कोरोनाची लागण, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा टोमणा
Follow us on

अयोध्या : अवघ्या दोन दिवसांत अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र मुहूर्तावरुन सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. कारण 5 तारखेला अशुभ मुहूर्त असल्याने भाजपच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली, असा टोमणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे (Digvijaya Singh on ram mandir bhoomi pujan).

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सध्या अयोध्येत दिवाळीसारखं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. मात्र, दिग्विजय सिंह यांच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा राजकारण तापताना दिसत आहे. राम मंदिराच्या पुजाऱ्याला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अशुभ मुहूर्तामुळेच कोरोनाची लागण झाल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे (Digvijaya Singh on ram mandir bhoomi pujan).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचं उल्लंघन केल्यामुळे राम मंदिराचे पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आले. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला रानी वरुण यांचं कोरोनामुळं निधन झालं. गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असून रुग्णालयात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोनाबाधित झालेत. त्यामुळे मी मोदींना विनंती करतो की, 5 ऑगस्टचा अशुभ मुहूर्त टाळा. शेकडो वर्षांनी राम मंदिराचं निर्माण कार्य करण्याचा योग आला आहे. आपल्या हट्टीपणामुळे यात आणखी विघ्न येण्यापासून थांबवावं”, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

अमित शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे ते भूमिपूजनाला हजर राहणार नसल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी दिली आहे. दुसरीकडे राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत रंगरंगोटी करण्यात आली आहे. ज्या मार्गावरुन पंतप्रधान मोदी जाणार आहेत, त्या मार्गावरील घरांना पिवळा रंग देण्यात आला असून घरांवर भगवे झेंडे फडकत आहेत.

राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख गेल्या महिन्यात निश्चित झाली असली, तरी मंदिरासाठी लागणारे दगड काही वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये या दगडांवर कोरीवकाम करुन ते अयोध्येत आणले गेले आहेत.

भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाला रामलल्लांना रत्नजडित हिरवा मखमली पोषाख घालण्यात येणार आहे. अयोध्येतील शंकरलाल टेलर यांनी खास रामलल्लांसाठी भगव्या रंगाचे कपडे तयार केले आहेत. रामलल्लांचे कपडे शिवणारी शंकरलाल टेलर यांची ही चौथी पिढी आहे.

राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर अयोध्येत 1 लाख 51 हजार लाडूंचा प्रसाद वाटला जाणार आहे. हे लाडू बनवण्याचं कामही पूर्ण झालं आहे. दोन दिवसांवर भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण आला आहे. त्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.

संबंधित बातमी :

मोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका ‘प्लॅन’ कसा?