रेशनपाणी, तेल, कपडे-चपला मिळणार मोफत, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी उघडला मॉल

| Updated on: Dec 29, 2020 | 3:28 PM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 34 वा दिवस आहे.

रेशनपाणी, तेल, कपडे-चपला मिळणार मोफत, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी उघडला मॉल
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 34 वा दिवस आहे. पंजाब, हरियाणासह देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्रानं मंजूर केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावे, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात तरुण, वृद्द, महिला, मुली आणि लहान मुलंही सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. (Farmers will get free everything they need Khalsa Aid build up Kisan Mall)

गेल्या 34 दिवसांपासून सुरु असलेलं हे आंदोलन कसं पुढे जात आहे? आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था काय? दिल्लीसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन कसे तग धरुन आहेत? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. शेतकऱ्यांनी स्वतः आणि या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्यांनी या आंदोलनाची नीट व्यवस्था केली आहे. चहा, जेवण, गरम कपड्यांपासून ते झोपण्यासाठीच्या अंथरुणापर्यंत शेतकऱ्यांनी चोख व्यवस्था केली आहे. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी आंदोलनाचे समर्थन करणारे लोक, स्वयंसेवी संस्था आणि काही पक्ष आपआपल्या परिने योगदान देत आहेत.

दरम्यान, खालसा एडने (Khalsa Aid) दिल्लीला लागून असलेल्या सिंघू बॉर्डरवर एक शेतकरी मॉल सुरु केला आहे. या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत दिल्या जात आहेत. यामध्ये बूट, चपला, तेल, साबण, गरम पाण्याचा गीझर, टूथपेस्ट, डिसपोजल बॅग्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. या मॉलप्रमाणे टिकरी बॉर्डरवर गेल्या आठवड्यात एक दुकान सुरु झालं आहे, जिथे शेतकऱ्यांना मोफत वस्तू दिल्या जात आहेत. रविवारी सिंघू बॉर्डरवर अजून एक दुकान सुरु झालं आहे, ज्या दुकानाद्वारे एकूण 28 प्रकारच्या वस्तू शेतकऱ्यांना मोफत पुरवल्या जात आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना भटकावं लागतं होतं.

आंदोलनात पुस्तकालय!

गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाजीपूर फ्लायओव्हरवर काही दिवसांपूर्वी एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. इथं अस्थायी स्वरुपात एक पुस्तकालय सुरु करण्यात आलं आहे. या आंदोलक शेतकऱ्यांनी या पुस्तकालयावर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळले. आंदोलकांमधीलच काही युवकांनी हे पुस्तकालय सुरु केलं आहे. यामध्ये सामाजिक प्रश्नांसह क्रांतीकारकांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकं पाहायला मिळाली. महात्मा गांधी, शहीद भगत सिंह आणि करतार सिंह सराभा यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यासोबतच अर्जेंटिनाचे मार्क्सवादी क्रांतिकारक चे ग्वेरा आणि रशियाचे लेखक मॅक्सिस गॉर्की यांचीही अनुवादित पुस्तकं इथं विक्रीसाठी आहेत.

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या शालू पवार आणि तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या विकल्प मंच या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन स्थळावर हे पुस्तकालय सुरु केलं आहे. या पुस्तकालयातील एका पुस्तकात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती देणारी एक पुस्तिकाही ठेवण्यात आली आहे. विकल्प मंच हा शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवरील साहित्याचं प्रकाशन करतो. त्यामुळे या शेतकरी आंदोलनात सहभागी होत, शेतकऱ्यांना एका विशिष्ट कार्याप्रती प्रेरित करण्यासाठी हे पुस्तकालय स्थापल्याचं शालू पवार हिने सांगितलं.

पोलिस आणि पत्रकारांनाही आंदोलकांकडून जेवण

दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सरकारचं जेवण आणि चहाच नाकारला आहे. उलट हे शेतकरी आंदोलनाच्या बातम्या करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना आणि सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनाही जेवण देत आहेत. जवळपास 6 महिन्यापर्यंत पुरेल इतका अन्नधान्याचा साठा या आंदोलक शेतकऱ्यांनी आणला आहे. स्वयंपाकाच्या सर्व वस्तू, गॅस सिलिंडर अशा अनेक गोष्टी या शेतकऱ्यांनी सोबत आणलंय. कायदे रद्द करण्याच्या मागण्यासाठी आम्हाला 6 महिन्यांपासून अधिक काळ राहण्याचीही आमची तयारी असल्याचं हे आंदोलन सांगत आहेत. आमच्यासोबत संपूर्ण दिल्लीलाही आम्ही जेवण घालू शकतो, एवढी आमची ताकद असल्याचं हे शेतकरी आवर्जुन सांगतात.

संबंधित बातम्या

मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

29 डिसेंबरच्या बैठकीला शेतकरी तयार, मात्र सरकारसमोर ‘या’ अटी

Farmer Protest : मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार

(Farmers will get free everything they need Khalsa Aid build up Kisan Mall)