नाशिकमध्ये दप्तर मागितल्याने बापाने दोन मुलांना विष पाजले

| Updated on: Jul 22, 2019 | 2:37 PM

नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलांना दप्तर मागितल्याने विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिकमध्ये दप्तर मागितल्याने बापाने दोन मुलांना विष पाजले
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलांना दप्तर मागितल्याने विष पाजल्याची धक्कादायक घटना आज घडली. पंढरीनाथ बोराडे असं आरोपीचं नाव आहे. पंढरीनाथ बोराडेने मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश या दोघांना विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या दोन्ही मुलांवर उपचार सुरु आहेत.

निकिता आणि ऋषिकेशने वडिलांकडं शाळेसाठी वही, पुस्तकं आणि दप्तराची मागणी केली. या मागणीने संतापलेल्या आरोपी पंढरीनाथ बोराडेने संतापून मुलांचा गळा दाबला. त्यानंतर दारुच्या नशेत आपल्या दोन्ही मुलांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला मुलांना मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने त्यांच्या तोंडात कीटकनाशक ओतले. मात्र, हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ दोन्ही मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

सध्या मुलगी निकिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर मुलगा ऋषिकेशवर जिल्हा रुगणालायत उपचार सुरु आहेत. मुलांचे आजोबा अण्णासाहेब नवले यांनी सांगितलं, “पंढरीनाथ बोराडे सुरुवातीपासूनच दारु पिऊन यायचा. तसेच पत्नीला मारहाण करायचा. त्याने पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांचे जमिनीचे वाद होते. त्याने पत्नी आणि मुलांना काहीही देणार नसल्याचंही म्हटलं होतं.”

पोलिसांनी मुलांचे जबाब घेऊन आरोपी नराधम बापावर गुन्हा दाखल करत त्यालाअटक केली आहे.