ज्येष्ठ अभिनेते कादर खान अनंतात विलिन, कॅनडात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते कादर खान अनंतात विलिन, कॅनडात अंत्यसंस्कार

टोरंटो : दमदार संवाद लेखण आणि अभिनयामुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर छाप सोडलेले अभिनेते कादर खान अनंतात विलिन झाले. कॅनडातील टोरंटोमध्ये भारतीय वेळेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कादर खान यांचे भारतातील नातेवाईक कॅनडात उपस्थित होते. कादर खान आपल्यात राहिले नसले तरी त्यांनी लिहिलेले संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.

कादर खान यांचं पार्थिक दुपारी बारा वाजता मशिदीत नेण्यात आलं. नमाज पठणानंतर दफनविधीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ‘स्पॉटबॉय’च्या वृत्तानुसार, अखेरचा श्वास घेण्याच्या काही वेळ अगोदरच कादर खान कोमात गेले होते.

कादर खान यांनी अखेरचं जेवण गुरुवारी केलं होतं. मुलगा सरफराजची पत्नी साहिस्ताने हे जेवण बनवलं होतं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातलं अन्न खाण्यास नकार दिला. जेवण करणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांची सून साहिस्ताने समजावून सांगितलं, पण जेवण करणं त्यांना शक्य झालं नाही.

कादर खान यांना मृत्यूपूर्वी एक शब्दही बोलता आला नाही. ते फक्त डोळ्यांनी इशारा करत होते. कोणत्याही परिस्थितीत घरचं जेवण करण्याची त्यांची इच्छा होती, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलंय. सलग पाच दिवस जेवण न करताही त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.

संघर्षातून तयार झालेला अभिनेता अशी कादर खान यांची ओळख आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून ते पुढे आले आणि संघर्ष करत स्वतःचं विश्व निर्माण केलं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. राजकारण्यांपासून ते दिग्गज अभिनेत्यांपर्यंत सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI