हिमाचल प्रदेशमध्ये हॉटेलची इमारत कोसळली, 35 जवानांसह 50 जण दबल्याची भीती

हिमाचल प्रदेशमधील सोलनमध्ये 3 मजली ‘सेहज धाबा’ हॉटेलची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीखाली 50 हून अधिक लोक दबले गेल्याचे सांगितले जात आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये हॉटेलची इमारत कोसळली, 35 जवानांसह 50 जण दबल्याची भीती


शिमला: हिमाचल प्रदेशमधील सोलनमध्ये 3 मजली ‘सेहज धाबा’ हॉटेलची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीखाली 50 हून अधिक लोक दबले गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये भारतीय सैन्याच्या 35 जवानांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित जवान प्रवासादरम्यान या ठिकाणी जेवणासाठी थांबले होते.

दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळावर पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जोरदार पाऊस असल्याने काही अडचणी येत आहेत. मात्र, स्थानिक लोकही यात मदत करत आहेत. आतापर्यंत इमारतीखाली दबलेल्या लोकांपैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी धर्मपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैन्य, पोलीस आणि एनडीआरएफची पथकं दबले गेलेल्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

‘हिमाचल प्रदेशमधील अशा प्रकारची पहिलीच घटना’

सोलनचे उपविभागीय दंडाधिकारी रोहित राठोड यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळावर पोहचले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली मदत कार्य सुरु आहे. इमारत कोसळण्याचे कारण मात्र, अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अशाप्रकारच्या इमारत कोसळण्याची ही हिमाचल प्रदेशमधील पहिलीच घटना मानली जात आहे.

कोसळलेल्या 3 मजली इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर धाबा होता. तसेच वरील मजल्यांवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही इमारत रस्त्याच्या अगदी जवळ होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI