हवाई दलाचं विशेष विमान, इराणमध्ये अडकलेले 58 भारतीय अखेर मायदेशी

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची पहिली तुकडी हवाई दलाच्या सी17 ग्लोबमास्टर विमानाने मायदेशी परतली आहे Indian pilgrims return from Iran

हवाई दलाचं विशेष विमान, इराणमध्ये अडकलेले 58 भारतीय अखेर मायदेशी

तेहरान : कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची अखेर हवाई दलाकडून सुटका करण्यात आली आहे. हवाई दलाचं सी17 ग्लोबमास्टर विमान मंगळवारी सकाळी 58 भारतीयांची पहिली तुकडी घेऊन गाझियाबादमधील हवाई तळावर दाखल झालं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Indian pilgrims return from Iran)

एस जयशंकर यांनी भारतीय हवाई दल, तेहरानमधील भारतीय दूतावास आणि भारतीयांची सुटका करण्यात मदत करणाऱ्या इराणमधील प्रशासनाचं कौतुक केलं आहे. हवाई दलाच्या सी17 ग्लोबमास्टर विमानाने सोमवारी उड्डाण केलं होतं. त्यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन विमान मंगळवारी परतलं.

महाराष्ट्राच्या सांगली-कोल्हापुरातील अनेक भाविक इराणमध्ये अडकले होते. 58 जणांच्या पहिल्या तुकडीत यापैकी किती जणांचा समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कोल्हापूर-सांगलीचे 34 जण इराणमध्ये अडकले, औषधं संपली, वृद्ध पर्यटकांच्या कुटुंबांची घालमेल

कोल्हापूर, सांगलीसह पलूस भागातील 34 पर्यटक आपल्या धार्मिक गुरुंसोबत इराक-इराणला धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. मुंबईमधील ‘साद टुरिस्ट कंपनी’च्या माध्यमातून 21 फेब्रुवारीला हे सर्व जण मुंबईहून रवाना झाले. 21 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत त्यांचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र इराकमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इराणकडून इराककडे जाणारी विमान वाहतूक 24 फेब्रुवारीला बंद झाली. त्यानंतर सर्व जण इराणमध्ये अडकले होते. (Indian pilgrims return from Iran)

जगभरात कोरोना व्हायसरने धुमाकूळ घातला असून इराणमध्ये 7 हजार 161 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये 237 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चीननंतर सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण इराणमध्ये आढळलं आहे.

याआधी, भारतीय हवाई दलाने चीनमधील वुहान शहरात आपलं विमान पाठवलं होतं. विमानाच्या सहाय्याने चीनमध्ये अडकलेल्या 76 भारतीय आणि 36 परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली होती.

Indian pilgrims return from Iran

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI