“नुकसानभरपाई हवीय, तर वाहून गेलेल्या शेळ्यांचे सांगाडे दाखवा”

"नुकसानभरपाई हवीय, तर वाहून गेलेल्या शेळ्यांचे सांगाडे दाखवा"

बीड : नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने विविध कर्जमाफीच्या योजना अंमलात आणल्या. मोठ्या गाजावाजात त्यांचा प्रचारही करण्यात आला. मात्र सरकारी यंत्रणेत या योजना कशाप्रकारे अडकून पडतात, याचे जिवंत उदाहरण सध्या मुंबईतील आझाद मैदानावर पाहायला मिळत आहे. पुरात वाहून गेलेल्या 13 शेळ्यांचे सांगाडे जोपर्यंत तहसीलदार कार्यालयात सादर करत नाही, तोपर्यंत आर्थिक मदत मिळणार नाही अशी अट सरकारी अधिकाऱ्याने घातली. शेवटी न्याय मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील गोगलवाडी गावातील शेतकरी पोपट जगताप हे आंदोलनाला बसले आहेत.

2016 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेतकरी पोपट जगताप यांच्या सर्व शेळ्या वाहून गेल्या. वाहून गेलेल्या 13 शेळ्या या जवळपास 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याचा पंचनामाही केला. मात्र आर्थिक मदत पाहिजे असेल, तर वाहून गेलेल्या शेळ्यांचे सांगाडे आणून द्या, अशी अजब अट या शेतकऱ्यासमोर ठेवण्यात आली.

पोपट जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाचं क्षेत्रफळ चार किलोमीटरचं आहे, तर उंची दोनशे फुटाहून जास्त आहे. अशात मृत शेळ्यांचे सांगाडे कशा प्रकारे शोधायचे, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. पोलीस पंचनामा झाला, शेतात शेळ्या होत्या तर त्यांच्या लेंड्या आहेत की नाही, याचीही चाचणी तहसीलदार कार्यालयातून झाली. तरिही या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली नाही.

मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही. अखेर पोपट जगताप हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसले. आज आठ दिवस झाले ते आंदोलन करत न्यायाची मागणी करत आहेत, मात्र या शेतकऱ्याची हाक प्रशासनापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI