‘फडणवीस चिथावणीखोर…’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, सोलापूर अन् अक्कलकोटही घेणार?

| Updated on: Nov 24, 2022 | 12:56 PM

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

फडणवीस चिथावणीखोर... कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, सोलापूर अन् अक्कलकोटही घेणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमा प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा मोठा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केलं आहे. बोम्मई यांनी बुधवारी यासंबंधीचं ट्विट केलं. ते म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आमच्या राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकात येऊ इच्छितात. त्यांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत…

त्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. महाराष्ट्रातलं एकही गाव कर्नाटकला देणार नाही. सुप्रीम कोर्टात बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकात गेलेली इतर गावही महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2012 मध्ये त्या गावांनी हा ठराव केला होता. पण सध्या असा काही नवीन ठराव झालेला नाही, असंही फडणवीस यांनी काल नागपुरात स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोक्त आरोप केले.

तसेच ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, आमच्या राज्यातील जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील ज्या भागात कानडी बोलली जाते, उदा. सोलापूर, अक्कलकोट इत्यादी, तेसुद्धा आमच्याकडे यावेत, अशी आमची मागणी आहे.

सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या खटल्याविषयी बोम्मई यांनी ट्विटमध्ये लिहिलंय- 2004 पासून महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात हा खटला दाखल केला आहे. पण अद्याप त्यांना यश आलेलं नाही. ते येणारही नाही, हे निश्चित. आम्ही कायदेशीर लढाईत मजबूत आहोत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सकारात्मक वातावरण असल्याचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं असलं तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतल्याने हा वाद आता आणखी चिघळणार अशीच चिन्हे आहेत.