मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, बळीराजाला सुखी करण्याचं साकडं

आषाढी एकादशी निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुचरणी बळीराजाला सुखी करण्याचं साकडं घातलं

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, बळीराजाला सुखी करण्याचं साकडं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 12, 2019 | 9:02 AM

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुचरणी बळीराजाला सुखी करण्याचं साकडं घातलं. त्यांच्याबरोबर पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याचे विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रयाग विठ्ठल चव्हाण या दामप्त्याला  मिळाला.

महापुजेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी विठ्ठलाची पूजा करायला मिळाल्याबद्दल मंदिर समितीचे आभार मानले. तसेच 2 वर्षांमध्ये मंदिर समितीने खूप चांगले काम केल्याचे म्हणत समितीच्या कामाचे कौतुकही केले. फडणवीस म्हणाले, “वारीच्या निमित्ताने सकारात्मक शक्तीचा अविष्कार पाहायला मिळतो. आमच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम वारी आणि वारकऱ्यांनी केलं आहे.”

‘नामामी चंद्रभागा हा मोठा कार्यक्रम हातात घेतला’

“निर्मल वारीला वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. नामामी चंद्रभागा हा मोठा कार्यक्रम हातात घेतला आहे. येत्या काळात चंद्रभागा पूर्वीसारखी निर्मल पाहायला मिळेल. देवाच्या दारी काही मागावं लागत नाही, पण मी विठुरायाला महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम करण्याची दुष्काळ मुक्ती निसर्गाचा लाभ देण्याची आणि बळीराजाला सुखी करण्याची मागणी केली आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

‘विठ्ठलरूपी जनता देखील पुन्हा 5 वर्षांसाठी सेवा करण्याची संधी देईल’

यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मागील वर्षीच्या महापूजा वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, मागील वर्षी विठुरायाचा आदेश होता की मी फक्त पंढरपुरात नाही, तुमच्या मनातही आहे. त्यामुळे पूजा घरी केली. विठुरायांबरोबर जनतेचा आशिर्वाद मिळाला म्हणून सगळे काम करू शकलो.” पंढरपूरला पुन्हा पुन्हा यायची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीसांनी विठ्ठलरूपी जनता देखील पुन्हा 5 वर्षांसाठी सेवा करण्याची संधी देईल, अशी आशा व्यक्त केली.

पंढरपूर महापूजेचे मानाचे वारकरी

विठ्ठल मारुती चव्हाण (61) आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण हे लातूर जिल्ह्यातील सुनेगाव गांडा (तालुका – अहमदपूर) येथील रहिवासी आहेत. शेतकरी असलेले विठ्ठल चव्हाण 10 वर्षे  गावचे उपसरपंच राहिले आहेत. सध्या तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणूनही ते काम करतात. ते 1980 पासून (39 वर्षांपासून) सलग वारी करतात. त्यांना 2 मुलं आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. दोन्ही मुलं पुणे येथे नोकरीस आहेत.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें