पिंपरीत घटस्फोटासाठी जहरी युक्ती, पत्नीच्या शरिरात HIV चे विषाणू सोडले

पिंपरीत घटस्फोटासाठी जहरी युक्ती, पत्नीच्या शरिरात HIV चे विषाणू सोडले

पुणे: हुंड्यासाठी मारहाण करुनही मन न भरल्याने, पतीने पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी तिच्या शरिरात थेट एचआयव्हीचे विषाणू सोडण्याचा क्रूर कृत्य केलं. पिंपरी चिंचवडमध्ये ही सुन्न करणारी घटना घडली. या प्रकरणी 27 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनंतर सनकी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा नराधम पती हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत होता. पैसे मिळत नसल्याने तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावला.  घटस्फोट मिळवण्यासाठी त्याने चक्क तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा आरोप आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडली. पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पडवळ नगर, थेरगाव इथे राहणारा तिचा पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा पती 2015 पासून पत्नीला मारहाण करत होता. नुकतंच त्याने हुंड्यासाठी पैशाची मागणी करुन घटस्फोटासाठीही तगादा लावला. मारहाण केल्यानंतर त्याने पत्नीला दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर सलाईनमधून तिच्या शरिरात HIV चे विषाणू सोडले.