मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Nov 05, 2020 | 4:37 PM

मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow us on

पंढरपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. (Maratha Kranti Thok Morcha announce Akrosh morcha on 7 november, District collector imposes curfew)

मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग, अशा अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

7 नोव्हेंबरला ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’

मराठा समाजाकडून 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तशी घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुंबई येथे 30 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. 7 नोव्हेंबरला या मोर्चाला पंढरपुरातून सुरुवात होणार असून 20 दिवसांचा पायी प्रवास करत सर्व आंदोलक मंत्रालयावर धडक देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आली आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तुळजापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारला 15 दिवसांचं अल्टिमेटम दिलं गेलं होतं. त्याला 21 दिवस उलटून गेले तरीही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं. एकूण २० दिवस हा मोर्चा असणार आहे. रोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहे.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

‘अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा’, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maratha Kranti Thok Morcha announce Akrosh morcha on 7 november, District collector imposes curfew