काश्मीरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, बलात्काऱ्याला दगडाने ठेचा : मेहबुबा मुफ्ती

काश्मीरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, बलात्काऱ्याला दगडाने ठेचा : मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : जम्‍मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सुंबल परिसरात 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्‍कार झाल्याची घटना समोर आली आहे. 9 मे रोजी झालेल्या या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. ठिकठिकाणी आंदोलनांना वेग आला आहे. आंदोलकांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तर दोषींना थेट ‘शरिया’ कायद्यानुसार दगडाने ठेचून मारायला हवे ,अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली.

मेहबूबा यांनी ट्विटरवर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “मी सुंबलमधील 3 वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना ऐकून स्तब्ध आहे. कोणत्या विकृत मानसिकतेचे लोक असे अत्याचार करत आहेत. समाज नेहमीच अशा घटनांमध्ये महिलांनाच दोष देतो. मात्र, खरंच त्या निरागस मुलीची काही चूक होती का? आज अशावेळी शरिया कायद्यानुसार गुन्हा करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारले पाहिजे.”

चॉकलेटचे  आमिष दाखवून अपहरण

पीडित मुलीच्या कुटुंबाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर या नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला. इफ्तारच्या आधी ही अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर पीडित मुलगी जवळच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. पीडित मुलीला श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करणाऱ्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी याच परिसरात असलेल्या एका गावातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांकडून घटनेचा निषेध आणि कठोर कारवाईची मागणी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्‍दुल्‍ला यांनीही ट्विट करत दोषींवर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, “जम्‍मू-काश्‍मीर पोलिसांनी दोषींना शिक्षा व्हावी यासाठी लवकरात लवकर तपास सुरु करावा. जे दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.”


हुर्रियत कॉन्‍फरन्सचे प्रमुख सैयद अली शाह गिलानी यांनी या घटनांना सामाजिक संबंधावरील आणि संस्‍कृतीवरील कलंक असल्याचे म्हटले आहे.


Published On - 8:52 am, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI